ग्रामपंचायतीत 1 कोटी 61 लाखांचा अपहार

0

पुणे । शिरुर तालुक्यातील कारेगाव ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यात न भरता स्वतंत्र खात्यात भरून 1 कोटी 61 लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी माजी सरपंचासह तत्कालीन ग्रामसेवकाच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाने दिले आहेत.

याप्रकरणी माजी सरपंच वनिता विश्वास कोहोकडे आणि माजी ग्रामसेवक विजय सोनवणे यांच्याविरोधात पोलिसांकडे फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे तसेच या दोघांसह कॅनरा बँकेच्या अधिकार्‍यांविरोधातही तक्रार देण्याचे आदेश शिरुर तालुक्याच्या गटविकास अधिकार्‍याला देण्यात आले आहेत. या संदर्भात विद्यमान सरपंच किसन नवले यांनी जिल्हा परिषदेकडे तक्रार केली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी याबाबतची माहिती दिली.

कामकाजांच्या वृत्तांची नोंद नाही
कारेगाव ग्रामपंचायतीला 2011 ते 2014 या काळात विविध कंपन्यांसह अन्य घटकांकडून करापोटी 1 कोटी 61 लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले होते. दरवर्षी विविध कंपन्यांकडून कर वसूल केला जात होता. वसूल झालेली रक्कम ग्रामपंचायतीचा ग्रामनिधी म्हणून बँकेतील खात्यात भरणे अपेक्षित होते. परंतु, या दोघांनी संगनमताने कॅनरा बँकेत परस्पर खाते उघडले. त्याबाबत ग्रामपंचायतीचा कोणताही ठराव घेतला नाही. त्याबाबत कामकाजाच्या वृत्तांची नोंद केली नाही. अनधिकृतपणे खाते उघडून त्यात ही रक्कम जमा केली. तसेच त्यानंतर वेळोवेळी परस्पर दोघांनी ही रक्कम बँकेतून काढून ती अपहार केल्याचे तपासात निष्पन्न झाले, अशी माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांनी दिली.

चौकशीचे आदेश
सरपंच नवले यांच्या तक्रारीची दखल घेऊन जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने संबंधित तालुक्याच्या गटविकास अधिकार्‍यांना चौकशीचे आदेश दिले होते. चौकशीचा अहवाल प्राप्त झाला. त्यात दरवर्षी विविध कंपन्यांना बोगस पावत्या देऊन रक्कम वसूल केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बँकांना 50 हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम रोख स्वरुपात देण्याची परवानगी नाही. तरीही रक्कम देण्यात आली. त्यामुळे सर्व माहिती संशयास्पद आढळली. त्यावरून कारवाई करण्यात आली आहे.
-संदीप कोहिनकर, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी.