ग्रामपंचायतीने जागा दिल्यास उभारणार नाना-नानी पार्क

0

नारायणगाव । वारूळवाडी ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून दिल्यास लहानमुले व ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना-नानी पार्क करून देण्यात येईल, असे आश्‍वासन जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांनी दिले. ग्रामपंचायत वारूळवाडी हद्दीतील आनंदवाडी रस्ता व साने वस्तीतील अंतर्गत रस्ता व कॉलेज रोडवरील रस्त्याचे भूमिपूजन बुचके व राष्ट्रवादी युवा नेते अतुल बेनके यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. सरपंच भाग्यश्री पाटे, उपसरपंच जंगल कोल्हे, संतोष खैरे, एम. डी. भुजबळ, संजय वारूळेे आदींसह कर्मचारी व ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते.

विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वारूळवाडीच्या ग्रामसचिवालयासाठी 52 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल. गावच्या विकासासाठी कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही. ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून दिल्यास त्या जागेचा सरकारी नजराणा भरून लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांसाठी पुणे, मुंबईच्या धर्तीवर नाना-नानी पार्क करून देण्याची जबाबदारी माझी राहील, असे बुचके यांनी सांगितले. गावच्या विकासासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे अतुल बेनके यांनी सांगितले.

1 कोटींचे ग्रामसचिवालय!
ग्राम निधीतून आनंदवाडी जिल्हा परिषद शाळेच्या रस्त्यासाठी 7 लाख, सानेवस्तीतील अंर्तगत रस्त्यांसाठी 6 लाख, व कॉलेज रोडवरील रस्त्यांच्या डांबरीकारणांसाठी 5 लाख असे 18 लाखांच्या विकासकामांचा भूमिपूजन करण्यात आले. मागील महिन्यात आनंदवाडी जि. प. शाळेशेजारी बगीचा करून खेळणी बसविण्यात आली. स्मशानभूमी सुशोभीकरण, नळपाणीपुरवठा, शाळा दुरुस्ती आदी विविध 50 लाखांची सामाजिक कामे करण्यात आली आहेत. ग्रामपंचायत सदस्यांच्या बैठक मासिक भत्त्यातून वारूळवाडी स्मशानभूमीत 20 लाकडी बाकडे बसविण्यात आले आहेत. आशा बुचके, अतुल बेनके व संजय वारुळे यांच्या मार्गदर्शनाखाली गावच्या विकासासाठी सुमारे 1 कोटी रुपयांचे ग्रामसचिवालय बांधण्याचा व भाजी बाजार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.