ग्रामपंचायत कार्यालयासमोर हॉटेल मालकाने केली तुंबलेल्या गटारीची स्वच्छता !

0

साकळी- ग्रामपंचायत कार्यालयासमोर चहाची हॉटेल असलेल्या मुजाहीद खान या हॉटेल मालकाने आपल्या हॉटेलच्या परीसरातील तुंबलेली गटार स्वतः स्वच्छ केली. गावात सध्या पावसाळ्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी गटार तुंबून सांडपाणी रस्त्यावर येते. अशा अस्वस्थतेमुळे दिवसेंदिवस रोगराईत वाढ होऊन अनेक आजार डोके वर काढत आहेत. दोन दिवसांपूर्वीच अतिसाराची लागण होवून पूजा पाटील या नऊ वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्याची दखल घेत प्राथमिक आरोग्य केंद्राकडून गावात 500 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात चार अतिसाराचे रूग्ण आढळून आले आहेत. त्या अनुषंगाने प्रशासन तर स्वच्छतेवर लक्ष देईलच पण आपणही स्वतः आपला परिसर स्वच्छ ठेवावा या हेतूने एक चांगला संदेश याव्दारे मुजाहीद खान यांनी दिला आहे.