सरपंच व सदस्य निवडणुकीसाठी ऑनलाइन अर्ज दाखल करावे लागणार असल्याने उमेदवारांना सायबर कॅफेचा आधार
महाड । ग्रामपंचायत निवडणूकांचे वारे आता वेगाने वाहू लागले आहेत. या निवडणुकीमुळे केवळ मतदारांनाच नाही, तर सायबर कॅफे व बँकांनाही सुगीचे दिवस आले आहेत. सरपंच व सदस्य निवडणुकीसाठी ऑनलाइन अर्ज दाखल करावे लागणार असल्याने उमेदवारांना सायबर कॅफेचा आधार घ्यावा लागत आहे, तर उमेदवाराला नविन बँक खाते काढावे लागणार असल्याने बँकांमध्ये गर्दीही वाढत आहे. रायगड जिल्ह्यात आक्टोबर महिन्यात २४२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. यावेळी सरपंच निवडही थेट जनतेतून होणार असल्याने या निवडणुकांना विशेष महत्त्व आले आहे. सत्ताकेंद्र टिकविण्यासाठी राजकीय पक्षांनी कंबर कसल्याने या निवडणुकीत पैशांचाही पाऊस पडणार असल्याने मतदारांची चांदी आहे. त्यातच निवडणूक आयोगाच्या नवीन नियमांचा फायदा सायबर कॅफे व बँकांनाही चांगलाच होत आहे.
कमान पाच ते सात हजार इच्छुक अर्ज दाखल करण्याचा अंदाज
या निवडणुकीत किमान पाच ते सात हजार इच्छुक अर्ज दाखल करण्याचा अंदाज आहे. निवडणुका जरी बिनविरोध करायच्या असल्या अथवा अर्ज मागे घ्यायचा असला तरीही ऑनलाइन अर्ज भरण्याचे सोपस्कार पूर्ण करावे लागणार आहेत. त्यामुळे या सर्वांना अर्ज दाखल करण्यासाठी सायबर कॅफेत जावे लागत आहे. कालपासून सायबर कॅफेत उमेदवार व पदाधिकार्यांची वर्दळ वाढू लागली आहे. एक अर्ज दाखल करण्यासाठी पाचशे रुपये सायबर कॅफेत आकारले जात आहेत. ही प्रक्रिया किचकट असल्याने व दिवसरात्र काम करावे लागत असल्याने हे दर आकारले जात आहेत. आणीबाणीच्या स्थितीत रक्क्म एक हजारापर्यत जात आहे.
बँकेची उलाढालही होणार
सायबर कॅफे मालकांना उत्पन्नाचे साधन मिळालेले असतानाच बँकानाही चांगले दिवस आलेले आहेत. अर्ज दाखल करणार्या प्रत्येकाला सरकारी अथवा अन्य बँकेत पूर्णपणे नवीन खाते काढावे लागणार आहे त्यामुळे बँकांची खाती वाढण्यास मदत होत आहे. शिवाय निवडणूक खर्च याच खात्यातून करावा लागणार असल्याने व खाते किमान रक्क्म पाचशे रुपयांनी उघडावे लागत असल्याने बँकेची उलाढालही काही काळ होणार आहे. निवडणुकीत मतदारांपयर्ंत जाण्यापूर्वी उमेदवारांना ही वारी पूर्ण करावी लागत आहे.