ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात आम्हीच नंबर वन

0

जळगाव: जिल्ह्यातील 687 ग्रामपंचायत निवडणुकींची धामधुम आज निकालाअंती संपली. गेल्या महिनाभरापासून या निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता लागली होती. ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यात आम्हीच नंबर वन असे दावे भाजपा, शिवेसना आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आले आहे.

ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात असले तरी राज्यात सत्तांतर झाल्यानंतर या निवडणुकीला विशेष महत्व प्राप्त झाले होते. जिल्ह्यातील विविध पक्षाच्या नेत्यांनी या निवडणुकांमध्ये फारसे लक्ष घातले नसले तरी दुसर्‍या फळीतील नेत्यांनी बैठका, मेळावे घेऊन ग्रामपंचायत निवडणुकीत चुरस निर्माण केली होती. जिल्ह्यात 92 ग्रामपंचायत आधीच बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित 687 ग्रामंपचायतींसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया सोमवारी पार पडली. मतमोजणीनंतर सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आकड्यांची गोळाबेरीत करीत जिल्ह्यात आम्हीच नंबर वन असल्याचा दावा केला आहे.

‘महाविकास’लाच कौल : ना. पाटील
राज्यभरात महाविकास आघाडी सरकारने चांगली कामे केल्याने ग्रामीण भागातील जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. ग्रामपंचायतीचे निकाल म्हणजे एकप्रकारे जनतेने महाविकास आघाडी सरकारच्या कामावर शिक्कामोर्तब केले आहे. सरकारने जनतेच्या गावपातळीवरील कामांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे जनतेला हे सरकार आपले वाटते. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांना याठिकाणी यश मिळाले आहे, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
ग्रामीण भागात महाविकास आघाडीचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावरून यापुढे ग्रामीण भागात आमची सत्ता अबाधित राहील. जळगाव जिल्ह्यात तर भाजपा नावापुरता, काही गावांपुरता उरला आहे. राज्यभर शिवसेनेने मजबुती आघाडी घेतली आहे, असा दावाही गुलाबराव पाटील यांनी केला.

भाजपाचाच बालेकिल्ला : आ. महाजन
गेल्या अनेक वर्षांपासून जळगाव जिल्हा हा भाजपाचा बालेकिल्ला राहिला आहे. आज ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालांनी पुन्हा एकदा हे सिध्द केले आहे. जिल्ह्यात सर्वत्र भाजपाच्या विचारांच्या उमेदवारांचा मोठा विजय झाला आहे. जिल्ह्यातील 375 पेक्षा अधिक ग्रामपंचायतींवर भाजपाने झेंडा फडकविला आहे. ग्रामीण भागातील लोकांचा विश्वास आजही भाजपावरच आहे. प्रत्येक तालुक्यात भाजपाचे कमळ फुलले आहे. जामनेर तालुक्यात तर महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. राज्यातही भारतीय जनता पार्टीला ग्रामपंचायत निवडणुकीत मोठे यश मिळाले आहे. राज्यातील ग्रामीण भागातील जनता ही महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर नाराज आहे. त्यामुळेच आज असे निकाल आले आहे. खडसे राष्ट्रवादीत गेले तरी त्याचा कुठेही फरक पडला नाही. जळगाव जिल्हा हा पुन्हा भाजपाचाच बालेकिल्ला असल्याचे भाजपाचे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे वर्चस्व : अ‍ॅड. पाटील
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर सव्वा वर्षात राज्यातील जनतेला हे सरकार आपलेसे वाटत आहे. महाविकास आघाडी सरकारने केलेली कर्जमाफी, शेतीविषयक धोरणे, गावपातळीवरील कामांमुळेच जनतेने विचारपूर्वक मतदान केले. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या
प्रवेशामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढली. ती ग्रामीण भागातील निवडणुकांच्या माध्यमातून दिसून आली आहे. जिल्ह्यातील 75 टक्के ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिल्याचा दावा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील यांनी केला आहे.

भाजपाची ताकद वाढली : आ.भोळे
जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालांनी भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढविला आहे. जिल्ह्यातील 370 पेक्षा अधिक ग्रामपंचायतींवर भाजपाने आपले वर्चस्व सिध्द केले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा तिघांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातुन निवडणूक लढविली. असे असले तरी भाजपाने सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकून आपली ताकद सिध्द केली असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार राजुमामा भोळे यांनी दिली.

शिवसेनेचाच भगवा : गुलाबराव वाघ
राज्यात शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने केलेल्या कामगिरीचा परिपाक म्हणून जिल्ह्यात शिवसेनेचाच भगवा फडकला असल्याचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी सांगितले. जळगाव विभागात जळगाव तालुक्यात 27, पाचोरा 51, भडगाव 18, एरंडोल 20, पारोळा 28, अमळनेर 6, धरणगाव 25, चाळीसगाव 8 असे एकूण 183 ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. तर 87 ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीने वर्चस्व मिळविले आहे. जिल्ह्यात भाजपाचे पुरते पानिपत झाले असल्याचा दावा गुलाबराव वाघ यांनी केला आहे.

आनंद वाटावा असे यश : अ‍ॅड. पाटील
जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये काँग्रेसने काही ठिकाणी स्वत:चे पॅनल उभे केले होते, तर काही ठिकाणी आम्ही आघाडी करून लढलो. काँग्रेस पक्षाच्या सर्वच नेत्यांनी निवडणुक काळात बैठका घेऊन काँग्रेसचे उमेदवार निवडून आणण्यासंदर्भात रणनिती आखली होती. त्यानुसार आम्हाला आनंद वाटावा असे यश निश्चीतपणे मिळाले असल्याचा दावा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील यांनी केला.