ग्रामपंचायत निवडणुकीमुळे बैठकांना जोर

0

बारामती । बारामती तालुक्यातील तेरा ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची जोरात तयारी सध्या सुरू आहे. यंदा जनतेतूनच सरपंच निवडायचा असल्याकारणाने चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. गावात निवडणूक असल्याकारणाने बैठकांना जोर आला आहे. गावपातळीवर निवडणूक असल्याकारणाने पक्षीय राजकारण आणायचे की नाही, यावर जोरात खलबते सुरू आहेत.

पणदरे, मोरगाव, लोणीभापकर ही तालुक्यातील लोकसंख्येने मोठी असणारी गावे आहेत. या गावाच्या निवडणुकांना चांगलेच महत्त्व प्राप्त झाले आहे. गटागटाच्या बैठका सुरू आहेत. परंतु, सरपंच म्हणून कोणाला मान्यता द्यायची यावर एकमत होताना दिसून येत नाही. सरपंचांच्या हातात कारभार जाणार असल्याने व या अर्थपूर्ण महत्त्व असल्याने इच्छुकांची संख्या चांगलीच आहे. अजूनतरी कोणत्याही राजकीय पक्षाने यात रस दाखविलेला दिसून येत नाही. राजकीय पक्षांनी कार्यकर्त्यांच्या बैठकाही लावलेल्या नाही. घोंगडी बैठकांनाही चांगलीच गर्दी होत आहे. भावी सरपंचांनी जेवणावळी सुरू केल्या आहेत. पण या जेवणावळी सध्या प्रमुख कार्यकर्त्यांसाठी आहेत.

पारावच्या गप्पा झाला कमी
बारामती तालुक्यात पावसाने चांगलाच जोर दाखवला आहे. चांगल्या पावसामुळे मतदार मात्र शेतात राबत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी निवडणुकांपेक्षा शेती कसण्यावरच भर दिला आहे. दिवसभर शेतात कष्ट केल्यामुळे पारावरच्या गप्पाही कमी केल्या आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवार शांत आहे. तालुक्यात तेरा ग्रामपंचायतीच्या निवडणूका आहेत. यात जिरायती भागातील ग्रामपंचायती जास्त प्रमाणात आहेत. बागायती पट्टयातील पणदरे ही ग्रामपंचायत फार महत्त्वाची आहे. केंद्र सरकारचा निधी हा थेट ग्रामपंचायतीला मिळू लागल्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणूकांना अर्थपूर्ण संबंध आला आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पैशांचा पूर वाहतो. हे चित्रही लवकरच दिसेल.