नागोठणे । ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तांत्रिक अडचणी उद्भवल्याने शनिवार 10 फेब्रुवारीला असणारी अंतिम तारीख निवडणूक आयोगाकडून दोन दिवस पुढे ढकलल्याने पर्यायाने मतदान 25 ऐवजी 27 फेब्रुवारीला घेण्यात येणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाचे अवर सचिव आर. व्ही. फणसेकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे. उमेदवारांच्या अर्जांची छाननी 14 फेब्रुवारी आणि 16 फेब्रुवारीला नामनिर्देशन पत्र मागे घ्यावयाचे असून त्याच दिवशी अंतिम उमेदवारांची नावे तसेच निवडणूक चिन्ह देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
नागोठणे ग्रामपंचायतीची निवडणूकसुद्धा याच तारखेला होत आहे व उमेदवारी अर्ज भरण्याची यापूर्वीची तारीख आज 10 फेब्रुवारीला संपत असल्याने रोहे तहसील कार्यालयात उमेदवार तसेच कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली होती. मात्र, अर्ज भरण्यासाठी दोन दिवस वाढले असल्याने हवशा, नवशा, गवशांसह कार्यकर्त्यांना त्यानिमित्ताने हायसे वाटले आहे. दरम्यान, ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी निवडणूक आयोगाचा सर्व्हर अनियमित असल्याचे निदर्शनास आले होते व त्याबाबत संपूर्ण महाराष्ट्रातून तक्रारी झाल्याची दखल घेऊन निवडणूक आयोगाने संबंधित निवडणुका दोन दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयाचे श्रेय नेहमीप्रमाणे नागोठण्यातील नेते मंडळींसह कार्यकर्त्यांनी घेतले असल्याची चढाओढ त्यानिमित्ताने रोहे तहसील कार्यालयात संबंधित प्रतिनिधीने कानोसा घेतला असता, ऐकावयास येत होती.