मुंबई । राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सुमारे साडेसात हजार ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार दुसर्या टप्प्यात 14 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. परंतु, याच दिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिन असल्याने आयोगाने ही तारीख बदलावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी सोमवारी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना केली.14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौध्द धर्माची दीक्षा घेतली होती.
त्यामुळे या दिवशी डॉ. आंबेडकरांचे अनुयायी लाखोंच्या संख्येने नागपूर दीक्षाभूमी आणि दादरच्या चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी जात असतात. याच दिवशी राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान जाहीर केल्याने मतदानाच्या टक्केवारीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाची 14 ऑक्टोबर ही तारीख बदलून दुसरी तारीख जाहीर करावी, असे ते म्हणाले. यासंदर्भात काँग्रेसचे शिष्टमंडळ निवडणूक आयुक्तांची भेटही घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.