किन्हवली : किन्हवली ग्रामपंचायतीचे सत्ता परिवर्तन होऊन एक वर्ष झाले. वर्षपूर्तिचे निमीत्त साधत 27 जूलै रोजी ग्रामपंचायतीची मासिक सभा बोलाविण्यात आली होती. या दरम्यान सत्ताधारी व विरोधक सदस्यांत अनेक मुद्दयांवरून सभागृहात खडाजंगी झाल्याने विजयाच्या वर्षपूर्ति आनंदावर विरजण पडले. दरम्यान ग्रामसेवकाने मध्यस्थी केल्याने वादावर पडदा पडला.
किन्हवली ग्रामपंचायतीत सत्तापरिवर्तन होऊन शिवसेनेची सत्ता आली आहे. या घटनेला एक वर्ष पूर्ण झाल्याचे निमित्त साधत सदस्यांची मासिक सभा बोलाविण्यात आली होती. प्रारंभी ग्रामसेवक बाळकृष्ण वाखचौरे यांनी सदस्यांच्या कार्यकाळास एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल दिलेल्या शुभेच्छांचा आनंद सदस्यांच्या चेहर्यावर फार काळ टिकला नाही.
मासिक सभेच्या सुरुवातीसच मागील सभेस उपस्थित असतानाही काही कारणास्तव सभा अर्ध्यावर सोडून गेलेले सदस्य गणेश कुंदे यांनी मागील प्रोसिडींवर स्वाक्षरी करण्याच्या मागणीला विरोधकांनी आक्षेप घेतल्याने त्यांनी आदळआपट करत सभात्याग केला. वर्षभरात केलेल्या विकासकामांचा आढावा द्या अशी मागणी रेटून धरलेल्या विरोधी सदस्य व सरपंच सत्यवती कुंदे यांच्यात जोरदार खडाजंगी, तसेच निवडणूकांमधील रोष कायम ठेऊन विरोधी पक्षातील नागरिकांची कामे प्रलंबित ठेवल्याच्या आरोपावरून उपसरपंच सुरैय्या पठाण व इतर सदस्यांत जोरदार तू तू मै मै झाल्याने विजयाच्या वर्षपूर्ति आनंदावर विरजण पडले.
विरोधी सदस्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना सत्ताधारी सदस्यांनी उत्तरे देण्याऐवजी बगल दिल्याने वाद विकोपाला जाण्याची चिन्हे असतानाच ग्रामसेवक बाळकृष्ण वाखचौरे यांनी मध्यस्थी केल्याने वादावर पडदा पडला. सत्ता परिवर्तनाचे एक वर्ष होऊनही किन्हवली ग्रामपंचायतीच्या नुतन कार्यालयाचे रखडलेले उद्घाटन, उपसमित्या गठीत न करणे,सभागृहात कार्यकारी मंडळाचा नाम पदावली फलक न लावणे, माहितीच्या अधिकार अर्जकर्त्याला खोट्या ग्रामसभांच्या प्रोसिडींगच्या छायांकीत प्रती देऊन दिशाभूल करणे अशा एक ना अनेक वादग्रस्त प्रकरणांनी किन्हवली ग्रामपंचायतचा कारभार सध्या चर्चेत आहे.