मुंबई । सीएसआर, शासनाचा निधी आणि लोकांचा सहभाग यांच्या एकत्रित सहभागातून सुरु करण्यात आलेल्या ग्रामीण सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीने राज्यात चांगली गती घेतली आहे. कॉर्पोरेट क्षेत्राने या कामी दाखविलेला उत्साह आणि दिलेला सहयोग निश्चितच कौतुकास्पद आहे. महाराष्ट्र ग्रामीण सामाजिक परिवर्तन फाऊंडेशनच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात हाती घेतलेल्या 1 हजार गावांचा सर्वांगिण विकास तर केला जाईलच; पण या माध्यमातून इतर गावांनाही प्रेरणा मिळून राज्यात ग्रामविकासाची चळवळ अधिक गतिमान होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. सीएसआर निधी, राज्य शासनाचा निधी आणि लोकांचा सहभाग यांच्यामधून राज्यातील एक हजार गावांचा विकास करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. यासाठी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र ग्रामीण सामाजिक परिवर्तन फाऊंडेशनच्या गव्हर्निंग कौन्सिलची तिसरी बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते.
यांची होती उपस्थिती:
बैठकीस ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा, आनंद महिंद्रा, राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील – निलंगेकर, जलसंधारण मंत्री प्रा.राम शिंदे, उद्योजक रॉनी स्क्रूवाला, जरीना स्क्रूवाला, अजय पिरामल, अमीत चंद्रा, पार्थ जिंदाल, शिखा शर्मा, संजीव मेहता, हेमेंद्र कोठारी, निखिल मेस्वानी, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, विविध विभागांचे सचिव यांच्यासह विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आदी उपस्थित होते. महाराष्ट्र ग्रामीण सामाजिक परिवर्तन योजनेसंदर्भात आपण नुकतीच प्रधानमंत्र्यांना माहिती दिली. त्यांनीही या योजनेचे कौतुक केले आहे. एकाच कामासाठी विविध योजना राबविण्याऐवजी अशा विविध योजनांचे एकत्रीकरण करुन गावांमध्ये विकास कामे केली जात आहेत. गावांचा शाश्वत विकास होण्यासाठी लोकांची मानसिकता बदलणे आवश्यक असते. लोकांचा सहभाग घेऊन कामे केल्यास ती निश्चितच शाश्वत होतात. दुर्गम भागात आयटी तंत्रज्ञानाचा वापर करून कनेक्टिविटी वाढविण्यावर भर देण्यात येत आहे.
विकास आराखडे तयार
या योजनेतून निवडण्यात आलेल्या गावांचे विकास आराखडे तयार करण्यात आले आहेत. शिवाय या गावांसाठी पूर्णवेळ ग्रामपरिवर्तक नेमण्यात आले आहेत. राज्य शासनाचा निधी आणि सीएसआर निधी या गावांना उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यातून गावांमध्ये विविध योजना राबविण्यात येत आहे. बैठकीत काही प्रातिनिधिक जिल्ह्यांमधील गावांनी तयार केलेल्या विकास आराखड्यांचे सादरीकरण केले.यापैकी यवतमाळ जिल्ह्यातील गणेशवाडी गावाला आदर्श विकास आराखडा तयार केल्याबद्दल मुख्यमंत्री यांच्याहस्ते 5 लाख रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले.