भुसावळ । गावाच्या विकासासाठी सर्वसामान्य नागरीक व लोकप्रतिनिधींनी एकत्र येवून प्रयत्न केल्यास विकास करणे सहज शक्य आहे. याचे उदाहरण म्हणजे साकेगाव ग्रामपंचायत असून स्मार्ट गावाच्या पंक्तीत साकेगावचा समावेश झाला असून गावात सर्व सोयीसुविधा सद्यस्थितीत उपलब्ध झाले आहे. त्यामुळे येथील कामांचा आदर्श इतर गावांनीही घेतल्यास त्याचाही विकास साधणे शक्य असल्याचे प्रतिपादन आमदार संजय सावकारे यांनी केले. तालुक्यातील साकेगाव ग्रामपंचायतीची महाराजस्व अभियानासाठी निवड झाली असून याअंतर्गत विविध शासकीय योजनांची माहिती व दाखले वाटप कार्यक्रम सोमवार 10 रोजी पार पडला. आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते डिजिटल सभागृह, निजर्तुंक जल प्रकल्प, ग्राम क्रीडा संकुल व वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी निवासी अप्पर जिल्हाधिकारी राहुल मुंडके, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, सहाय्यक पोलीस अधिक्षक निलोत्पल, तहसिलदार मिनाक्षी राठोड, जिल्हा परिषद सदस्य रविंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे यांची
उपस्थिती होती.
दाखल्यांचे केले वाटप
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसिलदार मिनाक्षी राठोड तर सुत्रसंचालन दिपक पाटील यांनी केले. यावेळी लाभार्थ्यांना उत्पन्न दाखले, वय व अधिवास दाखले, राष्ट्रीयत्व दाखले, संजय गांधी निराधार योजनेचे मंजूर पत्र तसेच राष्ट्रीय अर्थसहाय्यक योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश वाटप करण्यात आले. ग्रामपंचायत प्रशासनातर्फे आर.ओ. प्लान्ट अंतर्गत घरपट्टी, पाणीपट्टी भरणार्यांना मोफत 20 लिटर शुध्द पाणी देण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले. तसेच गावातील इतर प्रलंबित कामे आमदार निधीतून पूर्ण करण्याचे आश्वासन आमदार सावकारे यांनी दिले.
कार्यक्रमास अधिकारी व पदाधिकार्यांची होती उपस्थिती
याप्रसंगी कार्यक्रमास गटविकास अधिकारी सुभाष मावळे, कृषी अधिकारी पी.डी. देवरे, पंचायत समिती सभापती सुनिल महाजन, उपसभापती मनिषा पाटील, पंचायत समिती सदस्या प्रिती पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे, भाजपा तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, सरपंच आनंद ठाकरे, उपसरपंच शकिल पटेल, निवृत्ती पवार, वासेफ पटेल, ग्रामविकास अधिकारी एस.आर. चौधरी, तलाठी हेमंत महाजन, पोलीस पाटील राजू सपकाळे यांसह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
यांचा झाला सत्कार
याप्रसंगी निबंध स्पर्धेत सपना भोई, पूनम पाटील, अश्विनी कोळी, लहान गटात गायत्री भोई, लिना कोळी, मृणाली कोळी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच इयत्ता दहावी ते पदव्युत्तर परिक्षेत उत्कृष्ट यश संपादन केलेल्या पूनम मराठे, गणेश सोनवणे, लोकेश पाटील, मिलींद पाटील, कल्याण सनांसे यांचा तर खेळाडूंमध्ये बॉक्सिंगपटू हेमंत कोळी, योगेश सपकाळे, ओंकार माकोळे, मंदार वाघोदे, क्रिकेट स्पर्धेत सागर कोळी, सागर चौधरी यांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.