ग्रामसेवकांनी सर्व शासकीय योजना तळागळातील लोकांपर्यंत पोहोचवाव्यात

0

सासवड । शासनाच्या वतीने जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील वंचित घटक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येत आहेत. नागरिकांना त्याचा लाभ मिळावा यासाठी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या पदाधिकार्‍यांचा पाठपुरावा सुरू असतो. परंतु केवळ शासकीय कर्मचार्‍यांची उदासीनता कारणीभूत ठरल्याने त्यांना योजनांचा लाभ मिळण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे यापुढे सर्व योजना तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वच ग्रामसेवकांनी आपली मानसिकता बदलावी आणि गरजू आणि पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती सुरेखा चौरे यांनी केले आहे. पुरंदर तालुक्यातील सासवड येथील पंचायत समितीच्या छत्रपती संभाजीराजे सभागृहात नीरा मार्केट समितीचे संचालक सुनील धिवार यांच्या प्रयत्नातून आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी चौरे बोलत होत्या.

ग्रामसेवकांना धरले धारेवर
पुरंदर तालुक्यातील अनेक गावांमधून आलेल्या तक्रारी वरून चौरे यांनी ग्रामसेवकांना धारेवर धरले. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये शासनाच्या सर्व लाभाच्या योजनांचे फलक लावावेत, घरकुल कोणत्या योजनेतील आहेत? याबाबत सविस्तर माहिती द्यावी, तसेच आलेली सर्व घरकुल पूर्ण होण्यासाठी ग्रामसेवकांनी नागरिकांची अडवणूक न करता त्यांना योग्य ती मदत करावी, असे आदेश त्यांनी यावेळी दिले.

गावे होणार प्रकाशमय
आगामी काळात ग्रामीण भागात मागासवर्गीय वस्तीमध्ये स्वच्छ आणि शुद्ध पाणी पुरविण्यासाठी आरओ प्लँट बसविण्यात येणार आहेत. तसेच हायमास्ट दिवे बसविण्यात येणार असून गावे प्रकाशमय होणार आहेत. त्यासाठी तालुक्यातून जास्तीत जास्त प्रस्ताव सादर करावेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. उपस्थित अनेक गावच्या लाभार्थ्यांनी आपल्या अडचणी मांडल्या. या तक्रारींचे यावेळी निरसन करण्यात आले. गटविकास अधिकारी श्रीकृष्ण वेणीकर यांनी प्रास्ताविक केले. तर ग्रामविकास अधिकारी बबन चखाले यांनी आभार मानले.

योजना राबविण्यास अडचणी
घरकुल योजना ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचत आहेत. परंतु याबाबत नागरिकांना समाधानकारक माहिती दिली जात नाही. त्यामुळे नागरिकांच्या अनेक तक्रारी येत आहेत आणि योजना पूर्णत्वास नेण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे ग्रामसेवकांनी आपली मानसिकता बदलावी, असे चौरे यांनी सांगितले. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती दत्तात्रय काळे, नीरा मार्केट कमिटीचे संचालक सुनील धिवार, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण वेणीकर, सहायक गटविकास अधिकारी लक्ष्मण वाजे, तसेच इतर पदाधिकारी आणि ग्रामसेवक उपस्थित होते.