ग्रामसेवकांबाबत तक्रार

0

जळगाव।  पाचोरा तालुक्याच्या पंचायत समिती प्रशासनातील ग्रामपंचायतीवर नियुक्ती असलेल्या अनेक ग्रामसेवकांच्या मनमानी कामकाजामुळे ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. शासनाच्यावतीने ग्रामविकासाकरीता देण्यात येणार्‍या 14व्या वित्त आयोगाच्या खर्चात अनियमिततेची गटविकास अधिकार्‍यांपासून ते सीईओपर्यत तक्रारी करण्यात आल्या आहेत. पाचोरा तालुक्यातील कुरंगीत ग्रामसेवक अनुपस्थितीत होते. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत ध्वजारोहन करण्यात आले. तर खडकदेवळ्यात ग्रामस्थानी असुविधा असल्याने ग्रामपंचायतला कुलुप ठोकले आहे. शासनाच्या विविध ग्रामविकास योजनांचे लाभ तसेच प्रशासकीय कामकाजासाठी लागणारे कागदपत्रे, दाखले, सातबारा उतारे व अन्य महत्वपुर्ण कागदपत्रांची गरज असतांना ग्रामसेवकांच्या अनुपस्थितीमुळे नागरिकांच्या कामकाजात अडथळा येत आहे.

ग्रामसेवकांनी काढली पळ
खडकदेवळा खुर्द येथ 15 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी ग्रामसेवकास 14 व्या वित्त आयोगातील योजनेत खर्च झालेल्या रक्कमेची विचारणा केली. ग्रामसेवकाने ग्रामस्थांच्या तक्रारीकडे व विचारलेल्या प्रश्‍नांचे उत्तरे न देता ग्रामस्थांवर चिडुन वादंग निर्माण केला व ग्रामसभेतून पळ काढल्याची तक्रार करण्यात पंचायत समितीकडे करण्यात आली आहे.

पंचायत समिती सभापती सुभाष पाटील यांच्याशी याबाबत संवाद साधले असता त्यांनी ग्रामसेवकांच्या मनमानी कारभाराबाबत नियमित तक्रारी येत आहे. जो कोणी कर्तव्यात कसुर करुन जनतेची कामे करणार नाही त्यांची हयगय केली जाणार नाही असे सांगितले. याबाबत गटविकास अधिकारी यांच्याशी चर्चा करुन प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राजकीय वरदहस्त
ग्रामपंचायतीस मुख्यालयात नियुक्त ग्रामसेवक नियुक्तीच्या जागी न राहता अन्य शहरामधुन अपडाऊन करतात. त्यामुळे तक्रारी वाढल्या आहेत. तसेच शासानाकडून गावाच्या विकासासाठी मिळणार्‍या 14व्या वित्त आयोग निधीच्या खर्चात अनियमितता असल्याच्या अनेक गावातून बीडीओ पासून थेट मंत्रालयापर्यंत तक्रारी करुनही यातील दोषींची पारदर्शक चौकशी होत नसल्याची ओरड होवू लागली आहे. राजकीय वरदहस्त असल्याने अधिकारी जुमानत नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.