ग्रामस्थांच्या आंदोलना नंतर तळोंदे-पाथरजे बस सुरू

0

चाळीसगाव । तालुक्यातील तळोंदे-पाथरजे येथे 15 दिवसापासून बस बंद असल्याने ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाल्याने 25 जानेवारी 2017 रोजी सकाळी 10 वाजेपासून सरपंच व ग्रामस्थांनी दोन बस जवळपास 2 तास थांबवून आंदोलन केले होते. आंदोलनानंतर बस आगाराने 2 बस सुरू केल्या असून विद्यार्थी व ग्रामस्थांचे थोड्या-फार प्रमाणात हाल थांबले आहेत. तालुक्यातील तळोंदे-पाथरजे येथे गेल्या 15 दिवसांपासून दिवसभरामध्ये 4 फेर्‍या असणार्‍या बस बंद करण्यात आल्या होत्या. याबाबत सरपंच साहेबराव बाबु राठोड (तळोंदे) यांनी व ग्रामस्थांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर बस आगाराच्या वतीने रस्ता खराब असल्याचे कारण दाखवून बस बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यावर सरपंच राठोड यांनी ग्रामपंचायती मार्फत रस्ता दुरूस्त करून घेतल्यानंतर देखील बस सुरू झाल्या नाहीत.

पुन्हा सरपंचानी पाठपुरावा केल्यानंतर त्यांना समजले काही बस चालकांनी रस्ता खराब असल्याचे खोटे रिपोर्ट बस आगाराला दिल्याने बस बंद करण्यात आल्याचे समजल्यानंतर त्यांनी रस्ता दुरूस्त केला. याबाबत पुन्हा निवदने दिली, पाठपुरावा केला तरी देखील 15 दिवस बस सुरू झाल्या नाही त्यामुळे ग्रामस्थांचे व खास करून विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. वारंवार पाठपुरावा करून देखील बस सुरू न झाल्याने सरपंच साहेबराव बाबु राठोड, उपसरपंच बाबु भुरा चव्हाण व गावातील ग्रामस्थ, महीला, आणि विद्याथ्र्यांनी दि. 25 जानेवारी 2017 रोजी सकाळी 10 वाजेपासून रस्ता रोको आंदोलन करून 2 बसेस जवळपास 2 तास थांबवून ठेवल्या होत्या. आंदोलनानंतर बस आगाराच्या वतीने चौधरी नामक अधिकारी तळोंदे-पाथरजे येथे जाऊन त्यांनी रस्त्याची पाहणी केली असता, रस्त्यांची दुरूस्ती झाली होती मग बस बंद का ? असा सवाल सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांनी उपस्थित केल्यानंतर चौधरी यांनी तशी माहीती आगार प्रमुखांना दिल्यानंतर 26 जानेवारी पासून बस सेवा सुरू झाली असल्याची माहीती सरपंच साहेबराव बाबुराव राठोड यांनी दिली आहे.