कल्याण : कल्याण पुर्वेकडील जरी मरी देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थांनी मागील वर्षी दीड दिवसाच्या गणेश विसर्जनादरम्यान मूर्ती विसर्जनासाठी असलेल्या तरुणांमध्ये आणि पोलीस उपनिरीक्षकामध्ये रंगलेल्या वादानंतर अटक केलेल्या चार तरुणांचे आयुष्य उद्धस्त झाल्याचा आरोप करत यावर्षी या तलावात मूर्ती विसर्जन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गावातील 300 ते 350 मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तलाव उभारला जाणार असून यात बाहेरील मूर्ती विसर्जन करण्याची सोय केली जाणार नसल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या वर्षी दीड दिवसाच्या गणेश विसर्जना दरम्यान कल्याण पूर्वेकडील जरीमरी तलावात मूर्ती विसर्जन करणार्या तरुणाबरोबर संरक्षणासाठी असलेल्या पोलीस उपनिरीक्षक नितीन डगळे यांच्यात झालेल्या धक्काबुक्की नंतर डगळे यांना तलावात बुडवून मारण्याचा ठपका ठेवत मूर्ती विसर्जनासाठी तलावाच्याजवळ उपस्थित असलेल्या चार तरुणावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. यातील तीन तरुणांची जामिनावर सुटका करण्यात आली असली तरी राहुल हा तरुण अद्यापि कारागृहातच आहे. या घटनेनंतर त्रस्त झालेल्या जरीमरी सेवा मंडळाने पुढील गणपती विसरजनाला तलावावर फिरकने देखील टाळले होते
विसर्जनासाठी कृत्रिम तलाव
यंदा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी जरी मरी मित्र मंडळ आणि तिसगाव ग्रामस्थाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत जरी मरी तलाव हा गावचा तलाव असल्यामुळे यंदापासून या तलावात गणेशमूर्तीसह इतर मूर्ती विसर्जन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र यामुळे गावातील सुमारे 350 मूर्ती विसर्जनाचा प्रश्न निर्माण झाला असून यासाठी ग्रामस्थांच्या पुढाकाराने तलावाच्या मागच्या बाजूला कृत्रिम तलाव उभारला जाणार आहे. यात केवळ गावातील मूर्ती विसर्जन केल्या जातील. गावातील नागरिकांना विसर्जनाची माहिती असल्यामुळे याठिकाणी विसर्जनासाठी वेगळी सोय केली जाणार नसल्याचे अध्यक्ष नाना सूर्यवंशी यांनी सांगितले.
पर्यायी व्यवस्था करावी लागणार
या निर्णयात फेरबदल करण्यासाठीची मागणी होऊ नये, यासाठी या तलावाचे 15 ऑगस्टपासून सुशोभिकरणाचे काम सुरु करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे कल्याण पूर्वेतील हजारो गणेशूमूर्तीच्या विसर्जनाचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाला या भागातील गणेशमूर्ती विसर्जनासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे.