ग्रामस्थांना सलोखा राखण्याचे आवाहन

0

सणसवाडी । शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे झालेली दंगल ही दुर्देवी आहे. मात्र, कोणत्याही निर्दोष व्यक्तीवर कारवाई होणार नाही. यामधील दोषींचा शोध यंत्रणा घेत आहे. यासाठी ग्रामस्थांनी शांतता प्रस्थापित करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी केले. दंगलीतील आपत्तीग्रस्त ग्रामस्थांशी राव यांनी शनिवारी संवाद साधला.

प्रांतअधिकारी भाऊसाहेब गलांडे, तहसीलदार रणजीत भोसले, सरपंच संगिता कांबळे, उपसरपंच वृषाली गव्हाणे-पाटील, विठ्ठलराव ढेरंगे, नारायणराव फडतरे, अशोक गव्हाणे, राजाराम ढेरंगे, विजय गव्हाणे, अनिल काशिद, संजय काशिद, नितीन गव्हाणे आदींसह ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते. निपराध व्यक्तीला त्रास देऊ नका. दुकाने, वाहने पेटल्याने घरावर दगडफेक होऊ लागली. त्यामुळे काही नागरीक, तरुण स्वरक्षणासाठी रस्त्यावर आले. यात त्यांचा काय दोष? असा सवाल करत यातील नुकसानग्रस्तांना भरपाई कधी मिळणार, असा सवाल ग्रामस्थांनी केला. छत्रपती संभाजी महाराज आणि गोविंद गायकवाड यांच्या समाधीची राव यांनी पाहणी केली.

सणसवाडीवासीयांच्या वतीने निवेदन
या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये याची दक्षता घ्यावी तसेच समन्वय समिती स्थापन करून खर्‍या गुन्हेगारांना शासन होईल, यात निरपराधी लोकांना गोवले जाणार नाही असे राव यांनी आश्‍वासन दिले. सणसवाडीमधील ग्रामस्थांनी दंगलखोरांना रोखण्यास मदत केली असून यात गावातील काही तरुणांची नावे दंगलीत गोवण्यात आली आहेत. शासन दरबारातून योग्य कारवाई व्हावी यासाठी राव यांना गावाच्या वतीने निवेदन देण्यात आले. सणसवाडी औद्योगिक क्षेत्र असल्याने येथे पूर्वीपासून जातीय सलोखा असून अनेक जाती धर्माचे लोक येथे एकत्र राहतात. दंगलीच्यावेळी सणसवाडीमधील लोक स्वस्वरक्षणासाठी एकत्र आले होते, असे सरपंच रमेश सातपुते यांनी सांगितले.

अफवांवर विश्‍वास ठेवू नका
आम्ही सर्व परिस्थितीवर नियत्रंण मिळवत आहोत. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. यातील नुकसान भरपाई लवकर मिळावी, यासाठी प्रयत्न करणार आहे. नागरिकांनी अफवावर विश्‍वास ठेवू नका, असे राव यांनी यावेळी सांगितले. महिलांची संख्या लक्षणीय होती. ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस यांनी नियोजन केले.