जळगाव । सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बंद झोलेली देशी दारू दुकान व बियबार हे रहिवासी वस्तीत स्थलांतर झाल्याने याला म्हसावत येथील ग्रामस्थांनी विरोध दर्शवून दोन्ही दारू दुकानांवर तीनशेच्या जवळपास महिला व दोनशे पुरुष अशा जणांच्या जमावाने या दुकानांवर हल्ला केला आणि दुकानाची तोडफोड केली. यातच, या आंदोलनाचे नेतृत्व करणार्या चार जणांविरुध्द पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
रहिवाशांचा दोन्ही दुकानांना विरोध; जमावाकडून दुकानांवर ‘हल्लाबोल’
सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय व राज्यमार्गावर 500 मीटरच्या आत असलेल्या दारु दुकान व बियर बारला बंदी घातलेली आहे. त्यामुळे म्हसावद येथे शेखर भगवान सोनवणे यांच्या मालकीचे देशी दारुचे दुकान व किशोर चौधरी यांच्या मालकीचे निलम बार हे मुख्य रस्त्यावरुन बोरनार रस्त्याला इंदिरा नगर भागात रहिवाशी वस्तीत स्थलांतर झाले. मात्र, धार्मिक स्थळ व महिलांच्या शौचालयाचा वापरही याच भागातून असल्याने रहिवाशांचा या दोन्ही दुकानांना विरोध होता, तरीही हे दुकान सुरु झाल्याने रविवारी रात्री आठ वाजता तीनशेच्या जवळपास महिला व दोनशेच्यावर पुरुष अशांनी एकत्रित येऊन या दोन्ही दुकानांवर हल्ला चढविला. दुकानातील काम करणार्या नोकरांनाही मारहाण झाली. खुर्च्या, संगणक, पत्र्याचे शेड, वॉटर कुलर आदीची तोडफोड झाली.
25 हजार नेले लुटून
दुकानांवर हल्ला करण्यात प्रमुख भूमिका बजावणार्या गणेश आमले, विजय आमले, बबलु व आबा मुळे आदी जणांविरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी किरण शांताराम साळुंखे यांनी फिर्याद दिली असून या चौघांनी देशी दारु व निलम बार या दुकानात घुसून संगणक, टेबल, खुर्च्या व अन्य साहित्याची नासधूस करुन दोन्ही दुकानांमधील प्रत्येकी 25 हजार रुपये रोख लुटून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तपास उपनिरीक्षक रोहन खंडागळे करीत आहेत. दरम्यान, एका बड्या नेत्याच्या सांगण्यावरुन हा जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाल्याचा आरोप होत आहे.