भुसावळ । साकेगाव-कंडारी जिल्हा परिषद मतदार संघातील जोगलखेडा व भानखेडा या गावांना जिल्हा परिषद उपगटनेता तथा शिक्षण समिती सदस्य रवींद्र पाटील यांनी भेट दिली असता गावातील लोकांनी आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या. यावेळी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्याचे आश्वासन पाटील यांनी यावेळी दिले. जोगलखेडा व भानखेडा गावातील शेतकरी, महिला, विद्यार्थी यांच्या समस्या पाटील यांनी जाणून घेतल्या व त्या गावातील गुणवंत विद्यार्थीचा सत्कार करुन तिला शुभेच्छा दिल्या. त्यावेळी विद्यार्थी, महिला, गावकर्यांनी गावातील समस्यांबाबत सविस्तर माहिती दिली.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून समस्या सोडविणार
ग्रामीण भागात पाणीपुरवठा, पथदिवे, स्वच्छता यासह रस्त्यांची दयनिय अवस्था झालेली असून येथील लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षितपणामुळे या समस्या सुटण्याचे नाव घेत नाही. याबाबत ग्रामस्थांनी वारंवार संताप व्यक्त करुन देखील कुठलीही दखल घेतली जात नसल्यामुळे जिल्हा परिषद सदस्य रविंद्र पाटील यांनी आपल्या मतदार संघातील गावांना भेटी देण्यास सुरुवात केली आहे. या गावात भेडसावणार्या समस्या जाणून घेत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. यावेळी आपल्या समस्या लवकरात लवकर सोडविल्या जातील असे आश्वासन जिल्हा परिषद उपगटनेता तथा भुसावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी दिले. प्रसंगी जोगलखेडा व भानखेडा ग्रामपंचायत सरपंच पंकज पाटील, उपसरपंच पार्वताबाई सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश पाटील, रामसिंग मोरे, जानकीराम कोळी, अरुणा पाटील, जोगलखेडा पोलिस पाटील लिलाधर पाटील, भानखेडा पोलीस पाटील शरद पाटील, मंगेश पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते.