ग्रामीण भागांतील रस्त्यांसाठी 78 कोटी

0

पुणे । जिल्ह्यातील रस्ते चांगले असावे. चांगले रस्ते असतील तर अपघातांचे प्रमाण कमी होईल, यासाठी जिल्हा परिषदेकडून नेहमीच भरीव निधी दिला जातो. यावर्षीही जिल्हा वार्षिक योजना सन 2017-18 अंतर्गत ग्रामीण रस्ते आणि विकास व मजबुतीकरणासाठी 78 कोटी 25 लाख 83 हजारांच्या निधीस जिल्हा परिषदेने प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामध्ये बांधकाम विभाग दक्षिणसाठी 36 कोटी 50 लाख तर, उत्तर विभागासाठी 41 कोटी 69 लाख 83 हजार रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वास देवकाते यांनी दिली आहे.

हवेली तालुक्यासाठी 6 कोटी
जिल्ह्यातील खेडोपाड्यातील रस्त्यांचा विकास करण्यासाठी तसेच रस्त्यांचे मजबुतीकरण करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीस जिल्हा परिषदेने प्राधान्य दिले आहे. त्यामुळे वर्षात सर्वाधिक 78 कोटी 25 लाखांचा निधी मजबुतीकरणासाठी उपलब्ध होणार आहे. बांधकाम दक्षिण विभागांतर्गत ग्रामीण रस्ते मजबुतीकरणासाठी हवेली तालुक्यासाठी 6 कोटी 15 लाख निधीच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. त्यामध्ये बारामती आणि इंदापूरसाठी प्रत्येकी 6 कोटी 40 लाख, शिरूर 6 कोटी 20 लाख, पुरंदर तालुक्यासाठी 5 कोटी 11 लाख, दौंड 4 कोटी 90 लाख रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे. 38 कोटी 8 लाख 53 हजार रुपयांच्या निधीतून रस्ते विकास करण्यात येणार आहे.

आंबेगाव तालुक्यासाठी 4 कोटी
रस्ते विकास आणि मजबुतीकरणासाठी बांधकाम विभाग उत्तरमधील आंबेगाव तालुक्यासाठी 4 कोटी 97 लाख 90 हजारांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. आदिवासी आणि आदिवासी किमान गरजा सोडून 1 कोटी 63 लाखास मान्यता देण्यात आली आहे. जुन्नर तालुक्यासाठी 7 कोटी 4 लाख तर, आदिवासी किमान गरजा सोडून 1 कोटी 19 लाख, वेल्हा 2 कोटी 80 लाख, मावळ 5 कोटी 25 लाख, खेड 8 कोटी 47 लाख 50 हजार, मुळशी 4 कोटी 98 लाख, भोर 4 कोटी 15 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. मिळून 41 कोटी 59 लाख रुपयांच्या खर्चास जिल्हा परिषदेच्यावतीने प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

लवकरच कामाला सुरुवात
जिल्ह्यातील रस्त्यांचे मजबुतीकरण करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत 78 कोटी 25 लाख 83 लाखांच्या खर्चास जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ग्रामीण भागातही चांगले रस्ते असावे, दळण-वळण सुखकर व्हावे यासाठी हा भरीव निधी देण्यात आला आहे. लवकरच या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.
– विश्‍वास देवकाते,
अध्यक्ष-जिल्हा परिषद, पुणे