मालिका निर्मात्या नीला मोदी यांचे प्रतिपादन
चोपडा । कलेच्या क्षेत्रात सारेच समान असतात. तिथे जात, धर्म, गरिबी, श्रीमंती असे भेद नसतात. ज्याच्यात क्षमता असते, मेहनत करण्याची तयारी असते ते नक्कीच यशस्वी होतात. ग्रामीण भागातील मुलांमध्ये प्रचंड सर्जनशीलता असून त्यांना संधीची आवश्यकता आहे. चोपड्यातील कलेचे शिक्षण देणारी ही संस्था अशा कलावंतांना सतत प्रेरणा देत आहे ही बाब अभिनंदनीय आहे, असे प्रतिपादन ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या जगप्रसिद्ध मालिकेच्या निर्मात्या नीला असित मोदी यांनी केले.
चोपड्यातील भगिनी मंडळ संचलित ललित कला केंद्राच्या वार्षिक चित्रकला प्रदर्शनास नीला टेलिफिल्म्सच्या नीला मोदी यांनी आपले बंधू हरिभाई शाह यांच्यासमवेत नुकतीच भेट दिली. याप्रसंगी ललित कला केंद्राचे प्राचार्य राजेंद्र महाजन यांनी त्यांचे स्वागत करत चित्र भेट केले तर संजय बारी यांनी त्यांना रौप्य महोत्सवी स्मरणिका भेट दिली. या संस्थेतील मुलांना भविष्यात काही मदत लागल्यास आपण नक्की मदत करु, याबद्दल त्यांनी आश्वस्त केले. तर सलग 10 वर्षे भारतासह जगभरातील रसिकांचे मनोरंजन करणारी ’तारक मेहता का उलटा चष्मा’ ही मालिका रसिकांचा उदंड पाठिंबा व कलावंत, तंत्रज्ञ यांच्या मेहनतीमुळे यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी प्रा.आशिष गुजराथी, प्रीती गुजराथी, वसंत नागपुरे, श्रावणी महाजन यांच्यासह अतुल अडावदकर, प्रमोद वैद्य, नितीन पाटील हे उपस्थित होते.