ग्रामीण भागातील रेशनींग दुकानात पॉस मशीन

0

पुणे । केंद्र सरकारने कॅशलेस व्यवहारावर भर दिला असून शासकीय कार्यालयांनादेखील ई-पॉस मशीन पुरविण्यात आल्या आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रेशनिंग दुकानेदेखील 100 टक्के ई-पॉस मशीनद्वारे कार्यान्वीत करण्यात आली आहेत. ग्रामीण भागात 1,696 रेशनिंग दुकाने असून सर्व दुकानांमध्ये ई-पॉस मशीन कार्यान्वीत करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात डिसेंबर 2017 मध्ये 68.13 टक्के धान्य वाटप ई-पॉस मशीनद्वारे करण्यात आले. ग्रामीण भागाकरीता 14 हजार 327 मेट्रीक टन धान्य प्राप्त झाले होते. त्यापैकी 9 हजार 862 मेट्रीक टन धान्याचे वाटप ई पॉस मशीनद्वारे करण्यात आले. ई-पॉस मशीनद्वारे धान्य घेतलेल्या लाभार्थ्यांपैकी 61.13 टक्के आधार कार्ड व्हेरीफीकेशन झाले आहे. 86.89 टक्के आधार सिडींगचे काम पुर्ण झाले आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालये संगणीकृत (सप्लाय चेन मॅनेजमेंट) झाली असून ती कार्यान्वीत करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी पत्रकाद्वारे दिली.

रॉकेलची मागणी झाली कमी
ज्या शिधापत्रिकाधारकांकडे गॅस जोडणी आहे, त्यांना केरोसिन (रॉकेल) देण्यात येत नाही. या संदर्भात जिल्ह्यात शोधमोहीम घेऊन गॅस असतानाही रॉकेलचा लाभ घेणार्‍यांची नावे यादीतून कमी केली. त्यामुळे केरोसीनची मागणी कमी झाली असून ऑक्टोबर 2016 ते डिसेेेंबर 2017 पर्यत 39.9 टक्के रॉकेलची मागणी कमी झाली आहे.

शून्य केरोसीनचे उद्दीष्ट
यावर्षी सन 2018 मध्ये 100 टक्के धान्य वितरण पॉस मशीनद्वारे करणे, आधार सिडींग पुर्ण करणे तसेच लाभार्थ्यांना आधार व्हेरीफीकेशनद्वारे धान्य वितरण करणे आणि ग्रामीण भाग शुन्य केरोसिनवर आणण्याचे उद्दीष्ट जिल्हा पुरवठा शाखेने ठेवले आहे.