हडपसर । शिक्षण क्षेत्रात वाढलेल्या स्पर्धेत बहुजन रयतेचा ज्ञानमार्ग म्हणून आजही रयत शिक्षण संस्थेचे नाव आदराने घेतले जात आहे. सध्याच्या स्पर्धेच्या काळात आपला विद्यार्थी कोठेही कमी पडायला नको म्हणून संस्थेकडून वेळोवेळी अभिनव उपक्रम राबविले जात आहेत. ‘रयत गुरुकुल प्रकल्प’ हा असाच एक अभिनव उपक्रम गेली तीन वर्षांपासून संस्था राबवित आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी संस्थेकडून होत असलेल्या प्रयत्नांचे विद्यार्थी, शिक्षक व पालकांकडून स्वागत होत आहे.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांच्या संकल्पनेतून ‘रयत गुरुकुल प्रकल्प’ तीन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आला आहे. राज्य सरकारची मान्यताही त्याला मिळालेली आहे. सातारा जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेल्या या प्रकल्पाचे यश लक्षात घेऊन संस्थेच्या पुणे विभागातील सर्वच्या सर्व 67 शाखांमध्ये हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. प्रकल्प प्रमुख ए. के. निकम त्याचे काम पाहत आहेत.
शालेय शिक्षणाबरोबरच दररोज सकाळी दोन तासिका स्पर्धा परीक्षा मार्गर्शन, सायंकाळी इंग्रजी संभाषण कौशल्य व वाचन, आठवड्यातून एक तास योग शिक्षण, ताज्या घडामोडींवर चर्चा, खेळ याशिवाय एज्युकेशनल सॉफ्टवेअर, रयत मॅसेंजर ई बुक, ई बुक लायब्ररी, गणित प्रयोगशाळा, भाषा प्रयोगशाळा आदी माध्यमातूनही विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम या प्रकल्पात केले जात आहे. विद्यार्थी व पालकांडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. संस्थेविषयी आपुलकी असलेल्या नागरिकांकडून लोकसहभाग म्हणून या प्रकल्पाला मदत केली जात आहे. पुणे विभागासाठी संस्थेतील टी.एम. साळुंखे, आर.आर. कदम, ए.एल. कुंभार, ए. बी. आगलावे, एस. एम. देवरे, के.डी. रत्नपारखी, ए.बी. गायकवाड, डी.एन. घाडगे, ए.डी. मराडे, एस.एस. सुर्यवंशी, एस.टी. पवार, एस.एम. मोहिते, बी.एस. वनवे, बी.आर. पाटील, ए.आर. जाधव संस्थेचे हे पंधरा निवृत्त शाखा प्रमुख कोणत्याही प्रकारचा मोबदला न घेता कर्मवीर भाऊराव पाटलांच्या विचारांच्या आदरापोटी तसेच केवळ संस्था आणि विद्यार्थ्यांच्या प्रेमापोटी समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. त्यांना वेगवेगळ्या शाखांची जबाबदारी देण्यात आली आहे.
समन्वयक के. डी. रत्नपारखी म्हणाले, संस्थेत शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांमध्ये गरीब व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे प्रमाण मोठे आहे. त्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी रयत गुरूकुल प्रकल्प फायदेशीर ठरणार आहे. शैक्षणिक स्पर्धेत रयतचा विद्यार्थी मागे राहणार नाही याची काळजी घेण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. संस्थेच्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष राम कांडगे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था पातळीवर विविध प्रकल्प राबविले जातात. हा अतिशय वेगळा व विद्यार्थ्यांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणारा प्रकल्प आहे. आतापर्यंत राबविल्या गेलेल्या या प्रयोगामुळे विद्यार्थ्यांना चांगला फायदा होत असल्याचे दिसून आले आहे.