जयंत खोब्रागडे : जागतिक विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन
नारायणगाव । स्वत:मध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन असल्याशिवाय वैज्ञानिक उदयास येत नाही. प्रश्न निर्माण झाल्यावर आपली जिज्ञासा वाढते. ग्रामीण भागात शहरातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत विज्ञानविषयी अधिक जाणीव आहे. खोडद येथील जीएमआरटी प्रकल्पामुळे ग्रामीण भागात हा बदल पाहायला मिळतो, असे मत परमाणु ऊर्जा विभागाचे संयुक्त सचिव जयंत खोब्रागडे यांनी व्यक्त केले. जागतिक विज्ञान दिनानिमित्त खोडद येथे असलेल्या जीएमआरटी या संशोधन केंद्रात विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन खोब्रागडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
बी-बियाणे विकसीत करण्यावर भर
शेतीतील उत्पादन अधिक फायदेशीर व्हावे यासाठी कमी पाण्यावर येणारे व रेडिएशन तंत्रज्ञानाद्वारे किडीला कमी बळी पडणारी बी-बियाणे विकसीत करण्यावर अणुऊर्जा विभागाचा भर असल्याचेही खोब्रागडे यांनी सांगितले. यावेळी एनसीआरएचे केंद्र संचालक प्रो. यशवंत गुप्ता यांनीही मार्गदर्शन केले. विज्ञान प्रदर्शनादरम्यान पृथ्वीसदृश ग्रहांचा शोध हा मराठीतील माहितीपट विज्ञानप्रेमींचे खास आकर्षण ठरला. यावेळी जीएमआरटीचे संचालक डॉ. यशवंत गुप्ता, डॉ. जे. के. सोळंकी, धरमवीर लाल, अ. भी. जोंधळे, कौशल्य बुच, डॉ. सदानंद राऊत, रतिलाल बाबेल, विजय गायकवाड आदी मान्यवरांसह विज्ञानप्रेमी व विद्यार्थी याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
21 हजार विज्ञानप्रेमींनी दिली भेट
या प्रदर्शनात शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी दुषित पाण्याचा पुनर्वापर, मल्टी नोझल फवारणी पंप, मोबाईप बॅटरी चार्जर, हॉस्पीटल रोबोट, थ्रीडी प्रिंटर, वेगवेगळे तंत्रज्ञान प्रकल्प सादर केले होते. गेल्या वर्षी खोडद विज्ञान प्रदर्शनात सातारा सैनिक स्कुलच्या ग्रुपने सादर केलेल्या प्रकल्पाला राष्ट्रपतींच्या हस्ते यंग युनिवोटिव्ह अॅवार्डने गौरविण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनाला पुणे, नाशिक, कोल्हापुर, सातारा, यवतमाळ यांसह अनेक जिल्ह्यांतून 21 हजार विज्ञान प्रेमींनी भेट दिली. 300 प्रकल्प या ठिकाणी सादर करण्यात आले होते.