चिबंळी : बदलच्या लहरी हवामानामुळे गेल्या पधंरा दिवसापासुन शहरातील किमान तापमानात दिवसेंदिवस घट होत असल्याने थंडीची चाहूल जाणवू लागली आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून थंडी वाढली असून, किमान तापमान 19 अंशापर्यंत खाली आले आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी खेडोपाडी शेकोट्या पेटण्यास सुरुवात झाली आहे. इंद्रायणी नदीच्या परिसरातील खेड तालुक्यात औद्योगिक क्षेत्रात असलेल्या कुरूळी, चिंबळी, केळगाव, आळंदी, चर्होली, मोशी, डुडूळगांव, चल्होरी खु; निघोजे माजगाव, सोळू, मरकळ, गोलेगाव, धानोरे आदी गावांमध्ये थंडीची तीव्रता वाढली आहे. थंडी पाठोपाठ विविध संसर्गजन्य आजारांनी डोकेवर काढल्याचे दिसत आहे. सकाळच्या मोकळ्या हवेत फिरण्यासाठी नागरिकही मोठ्या संख्येने बाहेर पडत असून केळगाव – चिंबळी रस्ता, इंद्रायणी घाट, पद्मावती मंदिर परिसर नागरिकांचे जॉगिंगचे ठिकाण बनत आहे. थंडी दरम्यान आळंदी शहर पंचक्रोशीतील किमान तापमान 18 अंशापर्यंत खाली आल्याने थंडी चांगलीच जाणवत आहे. बोचर्या थंडीला सुरुवात झाल्याने त्वचा कोरडी पडते. त्यामुळे व्हॅसलिन, पॉन्ड्स या मॉइश्चरायझर क्रीमसह स्वेटर, कानटोपी, मफलर, हॅन्डग्लोव्हज यांना मागणी वाढलेली आहे. रात्रीच्या वेळी बस स्टॅन्ड, इंद्रायणी घाट, गावा गावातील चौकात, मंदिर परिसरात तसेच शहरातील विविध भागात शेकोट्या पेटू लागल्या आहेत.