ग्रामीण भागात पथदिवे बसविण्याची मागणी

0

मुक्ताईनगर। तालुक्यातील मौजे धुळे, पावरी वाडा, हिवरे या गावांमध्ये पथदिवे बसविण्यात येवून त्यावर विद्युत तारा ओढण्याची मागणी गेल्या चार महिन्यांपासून केली जात आहे मात्र याची दखल घेतली जात नसल्याने शिवसेनेतर्फे वीज वितरणचे कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले असून आंदोलनाचा इशारा दिला आहे. गावांमध्ये विजेचे पोल बसविण्यात येवून त्याठिकाणी नवीन विद्युत तारा टाकण्याची मागणी ग्रामस्थांतर्फे करण्यात आली होती.

मात्र वीज कंपनीच्या उदासिन कारभारामुळे हे काम अद्यापही रखडलेले आहे. त्यामुळे वीज वितरण प्रशासनाने याची दखल घेवून लवकरात लवकर काम पूर्ण करण्यात यावे अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे वीज वितरण प्रशासनास देण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रती वीज वितरण सहाय्यक अभियंता, तहसिलदार तसेच मुक्ताईनगर पोलीस निरीक्षकांना देण्यात आले आहे.