रावेर । ग्रामीण व दुर्गम भागातील उपेक्षित जनतेच्या आरोग्याची काळजी शासन घेत आहे. ग्रामीण भागातील गरजूंना आरोग्यसेवा मिळाली पाहिजे. यासाठी सामाजिक बांधिलकीतून फैजपूर येथे मोफत भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन ना. गिरीश महाजन यांनी रावेर येथे केले.
सभेस यांची होती प्रमुख उपस्थिती
महाआरोग्य शिबिरासंदर्भात सर्वपक्षिय पदाधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ता, अधिकारी, कार्यकर्ते यांची सभा येथील मराठा मंगल कार्यालयात 23 रोजी झाली. यावेळी व्यासपीठावर खासदार रक्षा खडसे, आमदार हरिभाऊ जावळे, माजी आमदार डॉ. गुणवंतराव सरोदे, माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ, उपाध्यक्ष पद्माकर महाजन, जिल्हा अध्यक्षा उज्वला पाटील, जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, तालुकाध्यक्ष सुनील पाटील, जिल्हा परिषद सदस्य रंजना पाटील, नंदा पाटील, अमोल पाटील, पंचायत समिती सभापती माधुरी नेमाडे, पी.के.महाजन, प्रल्हाद पाटील आदी उपस्थित होते.
गरजूंना लाभ होणार
यावेळी पुढे बोलतांना जलसंपदामंत्री गिरीष महाजन म्हणाले की, आरोग्य शिबिरासाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर व नाशिक येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ञ डॉक्टर मंडळी येणार आहे. याचा लाभ तळागाळातील जनतेला व्हावा यासाठी कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी परिश्रम घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी खासदार रक्षा खडसे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन वासुदेव नरवाडे यांनी केले.