ज्येष्ठ नागरीकांना आता शिवशाहीमध्येही सवलत, पत्रकारांना शिवशाही मोफत
मुंबई- एसटी महामंडळामार्फत समाजातील विविध घटकांना प्रवास सवलत दिली जाते. या प्रवास सवलतींची व्याप्ती वाढविण्यासंदर्भात एसटी महामंडळाने सादर केलेल्या प्रस्तावास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी आज येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यात प्रामुख्याने ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी त्यांना 12 वी पर्यंत मोफत प्रवास सवलत पास देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत ही सवलत 10वी पर्यंतच्या मुलींसाठी होती. 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरीकांना आता शिवशाही बससाठीही सवलत लागू करण्यात आली आहे. पत्रकारांनाही आता वातानुकूलीत शिवशाही बसमध्ये मोफत प्रवास करता येणार आहे. याशिवाय इतर विविध समाजघटकांनाही एसटी बसमध्ये प्रवासासाठी सवलतींची घोषणा मंत्री श्री. रावते यांनी यावेळी केली. या विविध सवलतींचा लाभ राज्यातील सुमारे 2 कोटी 18 लाख लाभार्थ्यांना होणार आहे.
एसटी महामंडळामार्फत समाजातील विविध वंचित घटकांना प्रवास सवलत देऊन त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जातो. यात प्रमुख्याने विद्यार्थी सवलत, ज्येष्ठ नागरीक सवलत, अंध-अपंगांना असलेली सवलत याचा राज्यातील लाखो घटकांना लाभ मिळत आहे. या सवलत योजनेची व्याप्ती वाढविण्याच्या प्रस्तावास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत संमती मिळाली. याबद्दल मंत्री श्री.रावते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रीमंडळ सदस्यांचे आभार मानले आहेत.
पत्रकारांनी मानले मंत्री दिवाकर रावते यांचे आभार
पत्रकारांना वातानुकूलीत शिवशाही बसमध्ये मोफत प्रवास सवलत योजना लागू केल्याबद्दल यावेळी उपस्थित पत्रकारांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचे आभार मानले. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे यांनी पुष्पगुच्छ देऊन मंत्री श्री. रावते यांचे अभिनंदन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार रविकिरण देशमुख, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दिलीप जाधव, कोषाध्यक्ष महेश पवार, राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य योगेश त्रिवेदी, पत्रकार संघाचे सदस्य मारुती कंदले, नेहा पुरव, विजय गायकवाड आदी उपस्थित होते.