अत्याचार रोखण्यासाठी मुलींना विशेष प्रशिक्षण; जिल्हा परिषदेचा नाविन्यपूर्ण उपक्रम
पुणे । मुलींवरील वाढते अत्याचाराचे प्रमाण लक्षात घेऊन पुणे जिल्हा परिषदेने स्मार्ट गर्ल उपक्रम हाती घेतला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आठवी ते बारावीच्या सुमारे ३लाख ८५ हजार शालेय मुलींना अत्याचारविरोधात सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुलींना ‘स्मार्ट गर्ल’ बनविण्यासाठी जिल्हा परिषदेत सोमवारी बैठक झाली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, उपाध्यक्ष व शिक्षण समिती सभापती विवेक वळसे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांच्यासह मुथा फाउंडेशनच्या मंजिरी सोळे उपस्थित होते.
दोन दिवसांचे प्रशिक्षण शिबिर
जिल्ह्यातील आठवी ते बारावीपर्यंतच्या सरकारी अनुदानित तसेच खासगी शाळेतील शालेय विद्यार्थिनींनी ‘स्मार्ट’ बनविण्यासाठी ’स्मार्ट गर्ल’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याकरिता जिल्हा परिषदेची यंत्रणा शांतीलाल मुथा फाउंडेशन, भारती जैन संघटना, यशवंतराव चव्हाण यांच्याबरोबर काम कऱणार आहे. त्याकरिता मुथा फाउंडेशनच्यावतीने दोन दिवसांचे प्रशिक्षण शिबिराचा अभ्यासक्रम तयार कऱण्यात आला आहे. त्या अभ्यासक्रमाद्वारे जिल्ह्यातील मुख्याध्यापिका अथवा महिला शिक्षिकांना त्याबाबतचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
मुलींवर होणार्या अत्याचाराविरोधात लढण्याचे प्रशिक्षण दोन दिवसांत दिले जाणार आहे. अत्याचारावेळी त्यांनी प्रतिकार कसा करावा याचे धडे त्यांना दिले जाणार आहे. जिल्ह्यातील सतराशे शाळांमधील मुलींना हे प्रशिक्षण मिळणार आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले.
माध्यमिक शाळेत राबविणार उपक्रम
ग्रामीण भागातील माध्यमिक शाळेत शिक्षण घेणार्या विद्यार्थिनींसाठी जिल्हा परिषद स्मार्ट गर्ल उपक्रम राबवत आहे. मुलींना शाळा तसेच रस्त्याने येता जाताना अथवा इतर कोणत्याही ठिकाणी मुलींची छेडछाड काढली जाते. त्यांच्यावर अत्याचार केले जातात अशावेळी मुलींनी अत्याचाराविरोधात लढण्याचे धाडस निर्माण व्हावे याकरिता मुलींना स्मार्ट गर्ल उपक्रमातून प्रशिक्षण देण्यातच येणार आहे. -विश्वास देवकाते, अध्यक्ष, जिल्हा परिषद
येत्या १ ऑक्टोबरपासून प्रशिक्षण
अत्याचाराविरोधात लढण्याबरोबर मुलींना व्यक्तिमत्व विकास, सामाजिक सुरक्षा, आरोग्याबाबत जनजागृतीचे धडे दिले जाणार आहे. सप्टेंबर महिन्यात शाळांमधील निवडक शिक्षिकांना प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर त्यांच्या माध्यमातून शाळांमध्ये प्रत्येक शिक्षिकांना प्रशिक्षण देण्यात येईल. येत्या १ ऑक्टोबरपासून जिल्ह्यातील शाळांमधील मुलींना प्रशिक्षित केले जाईल. – विवेक वळसे पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष