भुसावळ : भुसावळ ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.मयुर चौधरी यांना जळगाव तालुक्यातील निमखेडी येथील रहिवासी तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दिनेश कडू भोळे याने 50 हजार रुपयांची खंडणी मागितल्या संशयीताविरोधात डॉ. चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा बुधवारी दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
माहिती अधिकारात सुरूवातीला मागितली माहिती
डॉ.मयुर नितीन चौधरी हे येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक म्हणून काम करीत आहे. त्यांना 28 जुलै 22 या दिवशी माहिती अधिकारात दिनेश भोळे यांनी ग्रामीण रुग्णालयातील माहिती मागितली होती. ग्रामीण रुग्णालयात झालेल्या कर्मचार्याच्या भरतीची माहिती असल्याने ती त्यांना वेळेत दिल्यावरही त्याने मोबाईलवर मिसकॉल केले. आलेल्या कॉलवर कॉल लावल्यानंतर भोळे यांनी सांगितले की, तुम्ही मला ओळखत नाही का, मी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी यांची माहिती ठेवत असतो, मला तुम्ही माहिती अधिकारात अपूर्ण माहिती दिली. जी माहिती दिली आहे ती चुकीची आहे, माहितीच्या अधिकारात मी तुमच्यावर गुन्हा दाखल करू शकतो, प्रसार माध्यमातून तुमची बदनामी करेल, तुम्हाला कामाला लावेल, तुमच्याकडे ग्रामीण रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाला आहे. मी तुमच्या ग्रामीण रुग्णालयाला व्हीजीट करणार आहे, सर्वांनी प्रॉपर गणवेशात व ओळखपत्र घालून हजर राहण्यास सांगा, यानंतर पुन्हा दोन ते तीन दिवसांनी भोळे यांनी फोन करून मला ग्रामीण रूग्णालयाबाबत माहिती पाहिजे, मात्र त्यांना माहिती दिल्याचे डॉक्टरांनी सांगत तुम्ही मला वारंवार फोन करून त्रास देऊ नका, तुम्ही येथे या मी तुम्हाला कपाटाची चाबी देतो, तुम्हाला जी माहिती पाहिजे ती तुम्ही घ्या, असेही डॉक्टरांनी बजावले होते.
जळगावात मागितली खंडणी
डॉ. मयुर चौधरी जळगाव हे 10 सप्टेंबर 2022 या दिवशी शासकीय कामानिमित्त गेल्यानंतर त्यावेळी सुध्दा भोळे यांनी फोन केला. त्यावेळी मी जळगाव येथे आलो असल्याचे सांगितल्यावर त्यांनी रींग रोडवरील पुणेरी अमृततूल्य या दुकानावर मला भेटायला या, असे सांगितले. तेथे गेल्यावर त्यांनी मला चहा सांगायला लावला व तुम्ही मला चुकीची माहिती दिल्याचे सांगितले. तुम्ही काही गोष्टी माझ्यापासून लपवत आहात, तुमची नाडी माझ्या हातात आहे, असे म्हणत त्यांनी 50 हजार रुपये मला द्या नाही तर तुम्हाला खडी फोडायला पाठवेल, तुमच्या वरीष्ठांना माझ्याजवळील पुरावे देईल, अशी धमकी दिली. यावेळी डॉक्टरांसोबत मित्र रोहित रणदिवे हा सुध्दा सोबत होता. तुम्हाला पैसे देणार नाही, असे भोळे याला सांगितल्यावर त्याने तुला आत्महत्याशिवाय पर्याय नसल्याची धमकी देत तो तेथून तो निघून गेला. या सर्व प्रकारामुळे डॉ. मयुर चौधरी यांनी बुधवारी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिल्यानंतर दिनेश कडू भोळे याच्या विरूध्द खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.