शिक्रापूर । शिक्रापूरचे ग्रामीण रूग्णालय मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे या रुग्णालयात आजूबाजूच्या सात-आठ गावातील रुग्ण उपाचारासाठी येथे धाव घेतात. त्यामुळे या रुग्णालयात नेहमी मोठी गर्दी असते. नागरिकांची सतत वर्दळ येथे सुरू असते. परंतु या रुग्णालयाकडे जाणार्या रस्त्याची पावसामुळे दुरवस्था झाली आहे. या रुग्णालयात जाण्या-येण्यासाठी एकच रस्ता आहे. हा रस्ता खराब झाला आहे.
ठिकठिकाणी खड्डे पडले असून रस्ता उखडलेला आहे. तसेच रस्त्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर गवत उगवलेले असल्यामुळे रस्त्याची अवस्था एखाद्या पायवाटेसारखी झाली आहे. याच रस्त्याने रुग्णाला न्यावे लागत आहे. या रस्ताने चालणेही नागरिकांना कठीण होऊन बसले आहे. तर, रुग्णांची काय अवस्था होते, हे सांगणेही कठीण आहे. जिल्हा प्रशासनाने वेळीच लक्ष घालून या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी शिक्रापूर व परिसरातील नागरिकांकडून होत आहे.