108 रुग्णवाहिकेवरील वैद्यकीय अधिकार्याने केली बाह्यरुग्ण तपासणी
वरणगाव- ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णालयाचे काम रामभरोसे सुरू असून शनिवारी चक्क रुग्णांना तीन तास वैद्यकीय अधिकार्यांची प्रतीक्षा करावी लागली. एव्वढ्या मोठ्या रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांवर उपचार होत नसल्याचे रुग्णांमध्ये तक्रारी आहेत. शहरात वातावरणातील बदलामुळे थंडी, ताप मलेरीयासारख्या आजारांनी रुग्ण ग्रस्त झाले आहेत. शनिवारी पहाटे शंभरावर रुग्ण तपासणीसाठी आले होते मात्र या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी नसल्याने जवळपास तीन तास प्रतीक्षा करावी लागली तसेच सकाळी 11 वाजेच्या सुमारास 108 रुग्णवाहिका वरील वैद्यकीय अधिकार्याने सकाळची बाह्य रुग्ण तपासणी केल्याने प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला.
लसीकरणात गुंतले अधिकारी
रुग्णालयात दोन वैद्यकीय अधिकारी असून पैकी डॉक्टर क्षितीजा हिडवे या नाशिक येथे प्रशिक्षणासाठी गेल्या आहेत तर दुसरे वैद्यकीय अधिकारी डॉ.देवर्षी घोषाल यांच्याकडे वरणगाव ग्रामीण रुग्णालयासह इतर रुग्णालयांचा पदभार असल्याने त्यांना वरणगाव ग्रामीण रुग्णालयात वेळ देणे शक्य होत नाही यामुळे शालेय आरोग्य तपासणी पथकाच्या वैद्यकीय अधिकार्यांकडून बाह्यरुग्ण तपासणी केली जाते परंतु सध्या रूबेला व गोवर लसीकरणाचे काम सुरू असल्याने सर्व वैद्यकीय अधिकारी या कार्यक्रमात गुंतले आहेत त्यामुळे सकाळी ओपीडी सुरू होणे आवश्यक असताना या ठिकाणी एकही वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे.