ग्रामीण रुग्णालयात सोयीसुविधांचा अभाव

0

शिरूर । नागरीकांना आरोग्याच्या चांगली सेवा देण्यासाठी शिरूरमध्ये लाखो रुपये खर्च करून ग्रामीण रुग्णालय बांधण्यात आले. रुग्णालयत बांधून तीन वर्षे झाले तरी या रुग्णालयात अद्यापही सोयी-सुविधांचा अभाव असल्याचे दिसून येते. त्यामुळे रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. रुग्णांची ही गैरसोय तातडीने थांबवावी, अन्यथा 1 मे पासून रुग्णालयासमोर घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा क्रांतीवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी दिला आहे. तसे निवेदन त्यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकांना दिले आहे.

सोनोग्राफीची मशीन शासनाने उपलब्ध करून दिली आहे. मात्र, ती देखील बंद असल्याने रुग्णालयात सोनोग्राफी मशीन असताना केवळ डॉक्टर व प्रिंटर, कम्युटरअभावी रुग्णांना या सेवेपासून वंचित रहावे लागत आहे. रुग्णालयातील वैद्यकीय कचरा नष्ट करण्यासाठी शासनाने सुमारे 22 लाख रुपयांची मशीन दिलेली असताना जागेअभावी बंद आहे. त्याचबरोबर एक्स-रे मशीन शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे. मात्र, खाजगी क्षेत्राच्या दबावामुळे त्याची माहिती सर्वसामान्य नागरीकांपर्यंत पोहचविण्यात आलेली नसल्याचा आरोपही संजय पाचंगे यांनी निवेदनातून केला आहे.

दारुच्या बाटल्या, सिगारेटच्या पाकीटांचा खच
रुग्णालयात सर्वत्र अस्वच्छता पसरली असून परिसरात दारुच्या बाटल्या व सिगारेटच्या पाकीटांचा खच पसरलेला आहे. तसेच येथे रुग्णांना बसण्यासाठी करण्यात आलेल्या फरशीच्या कट्ट्यांवर वयोवृध्द, बालक, गर्भवती महिलांना बसणे अवघड होत आहे. त्यावरून तोल जाऊन पडल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असून येथे पार्कींगचीदेखील सोय नसल्याचे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

…तर घंटानाद आंदोलन
अनेक असुविधांच्या गर्तेत ग्रामीण रुग्णालय असून शिरूर तालुक्यातील सर्वसामान्य रुग्णांना चांगल्या उपचारांसह सर्व सोयीसुविधा तातडीने देण्यासाठी उपाययोजना करून 50 खाटांच्या रुग्णालयाच्या परवानगीसाठी योग्य तो पाठपुरावा करावा. अन्यथा 1 मे पासून रुग्णालयासमोर घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा क्रांतीवीर प्रतिष्ठानचे संजय पाचंगे यांनी निवेदनातून दिला आहे.

तातडीची वैद्यकीय सेवा जिन्याखाली
तालुकास्तरीय शिरूर ग्रामीण रूग्णालयात पुर्णवेळ वैद्यकीय अधिक्षकच नसतो. त्यामुळे रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागतो. धक्कादायक बाब म्हणजे येथे रुग्णांना तातडीची वैद्यकीय सेवा इमारतीच्या तळमजल्याच्या जिन्याखालीच अनेक वर्षांपासून दिली जात आहे.

लिफ्टअभावी रुग्णांचे हाल
लाखो रूपये खर्च करून बांधण्यात आलेल्या शिरूर ग्रामीण रूग्णालयाच्या इमारतीला तीन वर्षे लोटली आहेत. परंतु अद्यापपर्यंत इमारतीत लिफ्टची सोय करण्यात आलेली नाही. त्यामुळे गंभीर जखमी, वयोवृध्द, रुग्णांसह डॉक्टर, कर्मचारी यांचे हाल होत आहेत. तीस खाटांच्या या सुसज्ज ग्रामीण रूग्णालयातील खाटांवर अक्षरशः धूळ साचलेली असून आलेल्या रुग्णांना खाजगी डॉक्टरांकडे पाठवले जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्याचबरोबर कट प्रॅक्टीसचाच प्रकार शासकीय रुग्णालयात सुरू असल्याचा आरोप संजय पाचंगे यांनी दिलेल्या निवेदनात केला आहे.