ग्रामीण रुग्णालयास पुन्हा वैद्यकीय अधिकार्‍याच्या बदलीचे ग्रहण

0

वरणगाव। येथील ग्रामीण रुग्णालय गरीबांना उपचाराकरीता आधार देत असलेले नुकतीच वैद्यकिय अधिकारी यांची बदली झाल्याने रुग्णसेवा ही पुन्हा वरणगाव शहरात चर्चेचा विषय तयार झाला आहे. गेल्या अडीच वर्षांपासून येथील ग्रामीण रुग्णालयाचा वैद्यकीय कारभार डॉ. हर्षल चॉदा हे पाहत होते. त्यांच्या कार्यकाळात ते रुग्णसेवा विसरून स्वतः गैरहजर राहत असल्याने बर्‍याच वेळा रुग्णालय चर्चेचा विषय बनले होते. त्यांच्या बेजबाबदारी गैरहजेरीमुळे कित्येक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.

डॉक्टरांअभावी रुग्णांचे होणार हाल
जबाबदारी विषयाअनुसरून येथील विविध राजकीय पक्षाच्या पुढार्‍यांनी बरेच वेळा त्यांची कानउघळनी करुनसुध्दा त्यांची सवय जात नसल्याने त्यांनी 1 जून रोजी वरिष्ठांच्या संमतीनुसार स्वगावी जामनेर येथील रुग्णालयात बदली करून घेतल्याचे बोलले जात आहे. या विषयामुळे वरणगाव येथील ग्रामीण रुग्णालय पुन्हा चर्चेत आले असून गरीब रुग्णाचे काय? असा प्रश्न समोर आला आहे.

वरणगावला आता तरी डॉक्टर मिळणार का?
येथील ग्रामीण रुग्णालयात नेहमीच डॉक्टरांची कमतरता भासत असते त्यामुळे रुग्णसेवेचे तिन तेरा वाजत असतात. दुर्दैवी घटना घडते. तेव्हा राजकीय पुढारी येतात बोंबा मारून जातात मात्र कायमस्वरूपी डॉक्टर आणण्याकरीता कोणीही पुढे येत नाही. डॉक्टरांची बदली झाल्याने आता पुढारी काय दिवे लावतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

रुग्णसेवा पुन्हा विस्कळीत
गेल्या तीन महिन्यापासून येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैदयकीय अधिकारी डॉक्टर हर्षला चॉदा हे कौटूंबीक कारणामुळे रजेवर गेल्यापासून रुग्णालयाची सेवा विस्कळीत झाली होती. मात्र काही दिवसातच डॉ. देवीश्री घोषाल यांची कागदोपत्री नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यांच्याकडे भुसावळ व यावल तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाचा अतिरीक्त भार असल्याने त्यांनी रुग्णसेवा वगळता फक्त मृतकांचे शेवच्छेदना शिवाय कोणतीच सेवा देवू शकले नाही. पुन्हा रूग्णसेवेचा कारभार विस्कळीत झाला.