यावल । येथील ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी नसल्याने सतत वादाचे प्रसंग उभे राहतात. यावर तात्पुरती उपाययोजना करून तोडगा काढला जात असला तरी प्रसंगी नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होवून गंभीर पेचप्रसंग निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाढती रुग्णसंख्या पाहता सन 2013 मध्ये यावल ग्रामीण रूग्णालयाचा दर्जा उंचावून उपजिल्हा रूग्णालयास मंजुरी देण्यात आली. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत झाले. मात्र, यावलसोबत जिल्ह्यातील इतर ज्या रूग्णालयांचा दर्जा उंचावला, त्यांचे काम प्रत्यक्षात पूर्णत्वास आले. यावल अजूनही उपेक्षित आहे. असे असले तरी किमान आहे त्या रूग्णालयातून चांगली वैद्यकीय सेवा मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शवविच्छेदनाचा प्रश्न कायम
येथे रुग्णांच्या तोंडाला पाने पुसली जातात. येथे तीन वैद्यकीय अधिकार्यांची पदे असताना गेल्या फेब्रुवारीपासून एकही डॉक्टर उपलब्ध नाही. परिणामी रूग्णालय वार्यावर आहे. केवळ शालेय आरोग्य तपासणी पथकाच्या भरवशावर ढकलगाडी सुरू आहे. असे असले तरी काही घटना-दुर्घटनांमध्ये एखादी व्यक्ती मृत झाली, तर शवविच्छेदन करावे कुणी? हा प्रश्न नेहमीच उपस्थित होतो. शवविच्छेदनास विलंब झाल्यास नातेवाईक संतप्त होतात. याचा त्रास मात्र कर्मचार्यांना सहन करावा लागतो.
आमदारांची मागणी केली बेदखल?
येथील डॉ. कौस्तुभ तळेले यांचा 364 दिवसांचा सेवाकरार 13 फेब्रुवारी 2017 रोजी संपला. ते कार्यमुक्त झाल्यापासून येथे वैद्यकीय अधिकारी नाही. यासंदर्भात शहरातील नागरिकांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत यापूर्वी आमदार हरिभाऊ जावळे यांनी यावल रुग्णालयात कायम वैद्यकीय अधिकारी मिळवू, असे सांगितले होते. तसेच येथील समस्या आरोग्य मंत्र्यांकडे मांडून पाठपुरावादेखील केला होता. मात्र, वैद्यकीय अधिकारी काही मिळाला नाही. सत्तेत असूनही आमदारांची मागणी बेदखल का राहिली? अशी चर्चा शहरात आहे. काही अपघाताच्या घटनांमध्ये मतयास रुग्णालयात आणले असता अधिकारी नसल्याने वेळेवर शवविच्छेदन होत नाही, जेष्ठ नागरिकांना आवश्यक दाखले मिळणे, आरोपींची वैद्यकीय तपासणी होणे, रात्री-अपरात्री अत्यावश्यक आरोग्यसेवा मिळत नाही. या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याठिकाणी रुग्णाला उपचारासाठी आणल्यास वैद्यकिय अधिकारी नसल्यामुळे रुग्णांना तासन्तास डॉक्टरांची वाट पहावी लागते.
रुग्णांना आर्थिक भुर्दंड
महागड्या रुग्णालयात जाऊन गोरगरीबांना शक्य नसल्याने शासनाने गोरगरीबांच्या हितासाठी ग्रामीण रुग्णालय सुरु असून उपचाराची सुविधा उपलब्ध करुन दिली खरी मात्र, या रुग्णालयांमध्ये वैद्यकिय अधिकार्यांची पदे रिक्त असल्याचे दिसून येते. यामुळे ग्रामीण भागातून उपचारासाठी आलेल्या रुग्णांना वेळेवर तसेच योग्य उपचार मिळत नाही. वैद्यकिय अधिकार्यांच्या कमतरतेमुळे असलेल्या कर्मचार्यांवर कामाचा अतिरीक्त ताण तर पडतोच शिवाय रुग्णांना देखील तासन् तास उपचारासाठी थांबावे लागते. त्यामुळे नाईलाजास्तव रुग्णांना खाजगी रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे लागत आहे. यात त्यांना जास्तीचे पैसे द्यावे लागत असल्यामुळेे गोरगरीब रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. याकडे शासनाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.