जळगाव। शहरातील जळगाव। ग्रामीण भाग हा देशाचा आत्मा आहे. ग्रामीण जनतेच्या जीवावरच संपुर्ण देश अवलंबुन आहे. ग्रामीण जनतेच्या विकासाशिवाय देशाची प्रगती शक्य नाही. तळागाळातील ग्रामीण जनतेला न्याय देण्याचे काम ग्रामीण पत्रकार करीत असतो. शेवटच्या घटकापर्यतच्या जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच पत्रकार तत्पर असतो. ग्राम विकासात पत्रकाराची भुमिका महत्त्वाची आहे. असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केले. ते अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्यावतीन आयोजित एकदिवसीय अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन रविवारी 16 रोजी कांताई सभागृहात पार पडले. पुढे बोलतांना महाजन यांनी काही मोजक्या ग्रामीण पत्रकारांकडून पत्रकारितेचा दुरुपयोग केला जात असल्याने संपुर्ण पत्रकारिता बदनाम होत असल्याचे खंत व्यक्त केली. तीन सत्रात अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. अधिवेशनाप्रसंगी पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना नवरत्न पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष भगवान सोनार यांनी केले. सूत्रसंचालन अहेजाज मोहसीन, मोहिनी सोनार यांनी केले.
यांची होती उपस्थिती
ग्रामीण पत्रकार संघाच्या एकदिवसीय रास्तरीय अधिवेशनासाठी जिल्ह्याभरातुन तसेच राज्यातील विविध ठिकाणाहुन ग्रामीण पत्रकार उपस्थित होते. अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर आमदार सुरेश भोळे, जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला पाटील, समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे, पोलीस अधिक्षक जालिंदर सुपेकर, मच्छिंद्र पाटील, देशदुतचे संपादक हेमंत अलोने, देशोन्नतीचे संपादक मनोज बारी, ज्येष्ठ पत्रकार विक्रांत पाटील, मधुसुदन कोलते, विजय चोरमारे आदी उपस्थित होते.
नवरत्न पुरस्कार वितरण
ग्रामीण पत्रकारसंघाच्या राज्यस्तरीय अधिवेशन हे पहिल्यांदाच जळगाव शहरात घेण्यात आले. जिल्ह्यातील पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणार्या पत्रकारांना अखिल भारतीय ग्रामीण पत्रकारसंघाच्या वतीने ’नवरत्न दर्पण‘ पुरस्कार देऊन गौरविण्यात आला. विविध वृत्तपत्रात काम करणार्या 45 पत्रकांराना तसेच संपादकांना हा पुरस्कार देण्यात आला.
यांनी घेतले परिश्रम
अधिवेशनासाठी विविध समित्या तयार करण्यात आल्या होत्या. जिल्हाध्यक्ष भगवान सोनार, नरेंद्र कदम, कैलास देशमुख,लक्ष्मण सूर्यवंशी, पवन पाटील, ललित खरे, गणेश पाटील, सैय्यद शब्बीर अली नियाजली, योगेश विसपूते, सलीम पटेल, महेंद्र अग्रवाल, योगीनी काळुंखे, अनिल पालीवाल, ललित कोतवाल, किरण सोनवणे, शांताराम जाधव, प्रकाश चौधरी, विनायक दिवटे, कुमार नरवाडे, विजय पाटील, सतीष ब्राम्हणे, रविंद्र ठाकुर, आदींनी परिश्रम घेतले.
अशा आहेत मागण्या
नुकतेच राज्य विधीमंडळात पत्रकार संरक्षण कायदा मंजुर करण्यात आला आहे. गेल्या 12 वर्षापासून पत्रकार संरक्षण कायद्याची मागणी होत होती. संरक्षण कायद्याबरोबरच पत्रकारांना आरोग्य विषयक समस्या उद्भवल्यास राजीव गांधी (आताची महात्मा फुले) आरोग्य जीवनदायी योजनेंअतर्गत मोफत उपचार घेता येणार आहे. अधिवेशना दरम्यान पत्रकारांना किमान एस.टी.प्रवास मोफत व्हावा, पत्रकारांवर दाखल करण्यात येणार्या खोट्या गुन्हांची शहानिशा केल्याशिवाय गुन्हा दाखल करण्यात येऊ नये, सामुहिक विमा मिळावा, शासनाच्या विविध समितीमध्ये स्थान मिळावे आदी मागणी यावेळी करण्यात आली.