भुसावळ : तालुक्यात सात जिल्हा परिषद केंद्र असून एकूण 68 शाळा त्यात आहेत. यामध्ये सभापती राजेंद्र चौधरी व गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम पार पडला. किन्ही, दीपनगर व आचेगाव केंद्रात शिक्षण परिषद व स्नेह संमेलन संपन्न झाले. यात गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी यांनी भेटी देवून शिक्षक व विद्यार्थ्याचे कौतुक केले. ग्रामीण भागात पालकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून दरवर्षी हा उपक्रम घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. खाजगी शाळांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी अशा उपक्रमाची आवश्यकता असल्याचे गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांनी सांगितले. वरणगाव भागातील दोन केंद्राचे स्नेह संमेलन 28 रोजी होणार आहे.
आमदारांनी केले मार्गदर्शन
आचेगाव केंद्रात 19 रोजी स्नेहसंम्मेलन व शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमासाठी आमदार संजय सावकारे, गटशिक्षणाधिकारी विजय पवार उपस्थित होते. सोबत वरणगाव केंद्राचे प्रमुख, केंद्र प्रमुख विलास तायडे, आचेगाव केंद्रप्रमुख कश्यप तायडे व गजानन नारखेडे तसेच केंद्रातील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
लेट्स रिड अँन्ड राईट इंग्लिश उपक्रमाचा शुभारंभ
शुक्रवार 23 रोजी सकाळी 10 वाजता ‘लेट्स रिड अॅन्ड राईट इंग्लिश’ या नावीन्यपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ पंचायत समिती सभागृहात करण्यात येणार आहे. याप्रसंगी सभापती राजेंद्र चौधरी, उपसभापती मुरलीधर पाटील, गटविकास अधिकारी सुभाष मावळे, सीएलआर पुणे या संस्थेच्या प्रकल्प अधिकारी सुजाता दिवाण, गटशिक्षणाधिकारी विजय पवार उपस्थित राहतील.
तसेच सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख आणि निवडक जिल्हा परिषद शिक्षक यांचा प्रशिक्षण वर्ग घेऊन उपक्रमाबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. जिल्हा परिषदेच्या 10 शाळामध्ये डिजिटल क्लासरूमच्या माध्यमातून डीव्हीडीद्वारे इयत्ता 3 री च्या विद्यार्थ्यांना इंग्रजी लेखन-वाचनाचे धडे देण्यात येतील.
शिक्षण परिषदेला प्रतिसाद
गटशिक्षणाधिकारी पवार यांनी कार्यक्रमाचा आनंद घेऊन सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व बक्षिसही दिले. आपल्या जिल्हा परिषद शाळेची मुले-मुली कशातच कमी नाहीत. आज आपणही इतर माध्यमाच्या शाळांची बरोबरी करून पुढे जात आहोत. सर्वांनी प्रगतीचा ध्यास घेतला तर अशक्य काहीही नसते, असे मार्गदर्शन करतांना सांगून सर्वांना शुभेच्छा दिल्या. तळवेल मुलांच्या शाळेच्या संगणक कक्षाची पाहणी करून काही मार्गदर्शक सुचना देऊन समाधान व्यक्त केले. दुपारच्या सत्रात शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली. केंद्रप्रमुख तायडे, नारखेडे व विनय भोगे यांच्याहस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले. भोगे यांनी संदर्भात हसत खेळत इंग्रजी शिकायला व बोलायला पाहिजे विषयावर हसत खेळत मार्गदर्शन केले. केंद्रप्रमुख यांनी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र विषयांवर मार्गदर्शन केले.