पुणे । ग्रामीण भागातील गर्भवती महिलांसाठी प्रसूतीवेळी ‘सिझेरियन’ची सुविधा तेथील हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रायोगिक प्रकल्प पुणे जिल्ह्यात राबविला जात आहे. हाच प्रयोग सातारा, सोलापूर जिल्ह्यातील काही निवडक ग्रामीण हॉस्पिटलमध्ये राबविण्याचा निर्णय आरोग्य खात्याने घेतला आहे.पुणे जिल्ह्यातील सासवड, जुन्नर तालुक्यातील ग्रामीण हॉस्पिटलमध्ये हा प्रयोग सुरू आहे; तर बारामती, दौंड तालुक्यातील ग्रामीण हॉस्पिटलमध्ये राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनचे (एनआरएचएम) आयुक्त संजीवकुमार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. पुणे विभागाचे आरोग्य परिमंडळचे उपसंचालक डॉ. संजय देशमुख, तसेच विभागातील पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकार्यांसह तालुका वैद्यकीय अधिकार्यांची नुकतीच बैठक झाली. त्या बैठकीत या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
खासगी हॉस्पिटलमधील तज्ज्ञांची मदत
ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गर्भवती महिलांना गरज पडल्यास ‘सिझेरियन’ची सुविधा उपलब्ध नसते. त्यावेळी नातेवाइकांना खासगी हॉस्पिटल अथवा जिल्हा हॉस्पिटल किंवा ससून हॉस्पिटलशिवाय पर्याय राहत नाही. परिणामी ग्रामीण हॉस्पिटल सक्षमीकरण करण्यासाठी आता आरोग्य खात्याने खासगी हॉस्पिटलमधील स्त्री रोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ तसेच भूलतज्ज्ञांना सामावून घेणार आहे. कन्सल्टिंग आणि 24 तास सेवेसाठी या तज्ज्ञांना नियुक्त करण्यात येणार आहे. त्यासाठीचा पुणे जिल्ह्यात ग्रामीण हॉस्पिटलमध्ये ‘सिझेरियन’ची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य खात्यातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.
सकारात्मक निर्णय
पुणे जिल्ह्यात हा प्रायोगिक प्रकल्प संपूर्ण ग्रामीण हॉस्पिटलमध्ये राबविण्याबाबत सकारात्मक निर्णय झाला आहे. त्यापाठोपाठ सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील काही निवडक ग्रामीण हॉस्पिटलमध्ये तो राबविण्याची सूचना राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनचे संचालक डॉ. संजीवकुमार यांनी दिले आहेत. त्यानुसार सासवड, बारामती येथील ग्रामीण हॉस्पिटलमध्ये पाहणी करण्यात आली आहे, असेही सांगण्यात आले.
ग्रामीण हॉस्पिटल दुवा
ग्रामीण हॉस्पिटलमध्ये गर्भवतींना प्रसूतीवेळी सिझेरियनची सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयोग पुणे जिल्ह्यात सुरू आहे. टप्प्याटप्प्याने राज्यात हे पुणे मॉडेल राबविले जाईल. जिल्हा हॉस्पिटल आणि प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्यात ग्रामीण हॉस्पिटल हे दुवा आहेत. त्यामुळे ही यंत्रणा कार्यक्षम झाल्यास माता मृत्यू, बालमृत्यू कमी होण्यास मदत होणार आहे.