जळगाव । ग्रामविकास विभागाच्या विविध योजनांची चोपडा तालुक्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी केले. चोपडा तालुक्यातील कुसुंबे येथे आज सकाळी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत कुसुंबा-अनवर्दे-अजंटी सीम या रस्ता कामाचे भूमीपूजन राज्यमंत्री श्री. भुसे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर आयोजित सोहळ्यात राज्यमंत्री श्री. भुसे बोलत होते. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षास्थानी होते. यावेळी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, यावलच्या नगराध्यक्ष सुरेखाताई कोळी, चोपडा पंचायत समितीचे उपसभापती एम. व्ही. पाटील, जिल्हा परिषद सदस्य हरीश पाटील, पवन सोनवणे, चोपडा येथील नगरसेविका संध्या महाजन, लताबाई पाटील, दीपक जोहरी, डॉ. महेंद्र पाटील, मुरलीधर पाटील, दीपक चौधरी आदी उपस्थित होते.
आगामी काळात दोन कामांची मंजुरी होणार
राज्यमंत्री भुसे म्हणाले की, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनांच्या अटी व शर्ती प्रधानमंत्री ग्रामसडक योजने प्रमाणेच आहेत. ठेकेदारावर रस्त्याच्या दुरुस्तीची व निगा राखण्याची जबाबदारी पुढील पाच वर्षे राहील. त्यामुळे रस्त्याचे काम दर्जेदार होईल. या रस्त्याचे काम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण झाले पाहिजे, असेही निर्देश त्यांनी यावेळी संबंधितांना दिले. ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून आगमी काळात चोपडा तालुक्यात रस्त्यांची आणखी दोन कामे मंजूर करण्यात येतील. चोपडा तालुक्यातील 10 ग्रामपंचायतीच्या इमारतीचे प्रस्ताव तात्काळ सादर केल्यास त्यांना मंजुरी देण्यात येईल, असेही भुसे यांनी यावेळी नमूद केले.
रस्त्याच्या कामासाठी 582.54 लाखांचा निधी मंजूर
सहकार राज्यमंत्री पाटील म्हणाले की, कुसुंबा-अनवर्दे -अजंटी सीम या रस्त्याच्या कामासाठी 582.54 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून 10.600 किलोमीटर रस्त्याचे काम होईल. चोपडा तालुक्यातील अन्य रस्त्यांसाठी निधी उपलबध करुन देण्यासाठी प्रयत्न केले जातील. या गटात आणखी 18 कोटी रुपयांची कामे मंजूर आहेत, असेही त्यांनी सांगितले. तसेच चोपडाहून भोकरमार्गे जळगावला जाण्यासाठी 120 कोटी रुपये खर्चून रस्ता बांधण्यात येणार आहे. याशिवाय भोकर-खेडीभोकरी दरम्यान 51 कोटी रुपये खर्चाच्या पुलाचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. असेही त्यांनी नमूद केले. यावेळी जिल्हा परिषद, पंचायत समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.