ग्राहकदिन व्यापकपणे साजरा झाल्यास नागरीक आपल्या हक्कांविषयी जागृत होतील

0

बारामती । नागरीकांना ग्राहक संरक्षण कायद्याविषयी माहिती मिळणे आवश्यक आहे. नागरीक आपल्या हक्काविषयी जागृत झाल्यास वितरक व पुरवठाधारकाकडून लोकांची फसवणूक होणार नाही. ग्राहकदिन व्यापकपणे साजरा झाल्यास नागरीक आपल्या हक्कांविषयी जागृत होतील, असा विश्‍वास प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी व्यक्त केला.

बारामती येथील नवीन प्रशासकीय इमारतीत बारामती तहसिल कार्यालय व अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त महिला हित व ग्राहक परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे पुणे जिल्हा संघटक तुषार झेंडे, तहसिलदार हनुमंत पाटील, गटविकास अधिकारी प्रमोद काळे, ग्राहक पंचायतीचे महाराष्ट्र प्रदेश कोषाध्यक्ष दिलीप शिंदे, ग्राहक पंचायत संघटक प्रशांत तुपे, ग्राहक पंचायतीचे सदस्य, पदाधिकारी, विविध शासकीय विभागाचे अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

ग्राहक संरक्षण कायद्याबाबत मार्गदर्शन
ग्राहक पंचायतीचे पुणे जिल्हा संघटक झेंडे यांनी परिषदेत ग्राहक संरक्षण कायदा व नियमावली याविषयी सविस्तर माहिती दिली. नागरीकांनी सजगतेने वितरक व पुरवठाधारकाडून खरेदी वस्तूची पावती घेणे गरजेचे आहे. ग्राहक हा राजा असल्याची संकल्पना रुजली पाहिजे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा नागरीकांना होणारा लाभ याविषयी झेंडे यांनी मार्गदर्शन केले. ग्राहक पंचायतीचे शिंदे यांनी परिषदेत तालुक्यात मतदार याद्या दुरुस्ती व धान्य कोटा मुबलक पुरवठ्याची प्रशासनाकडून अपेक्षा व्यक्त केली.

ग्राहक दिन लोकचळवळ व्हावी
ग्राहक दिन कार्यक्रमात लोकांचा सहभाग वाढण्यासाठी ग्राहक दिन लोकचळवळ होणे गरजेचे आहे. शासनाने नागरीकांना सोयी-सुविधा, विविध कल्याणकारी योजना उपलब्ध करून दिल्या आहेत. लोकांना ग्राहक दिन कार्यक्रमातून आपल्या हक्क व जबाबदारी याविषयी माहिती मिळेल, असे प्रांताधिकारी निकम यांनी यावेळी सांगितले.

बारामतीत सर्वाधिक बायोमॅट्रीक मशीन
प्रास्ताविकात तहसिलदार पाटील यांनी जिल्ह्यात बारामती तालुक्यात रेशन दुकानात सर्वाधिक बायोमॅट्रीक मशीन बसविण्यात आल्याची माहिती दिली. ग्राहकांना कोणताही भेदभावाविना सेवा चांगल्या पद्धतीने मिळाव्यात, यासाठी सर्व अधिकारी वर्गाने एकजुटीने काम करण्याची गरज व्यक्त केली. गट विकास अधिकारी व ग्राहक पंचायतीचे पदाधिकारी यांची परिषदेत समयोचित भाषणे झाली. तालुक्यातील रेशन दुकानदार, महिला व नागरीक मोठ्या संख्येने परिषदेस उत्सर्फुतपणे सहभागी झाले होते.