भुसावळ ग्राहक संरक्षण कक्षातर्फे जागो ग्राहक अभियान
भुसावळ- शिवसेना भुसावळ तालुका ग्राहक संरक्षण कक्षातर्फे ’सक्षज्ञी राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ‘जागो ग्राहक अभियान’ राबविण्यात आले. आजच्या काळात ग्राहकांनी सतर्क राहणे गरजेचे असून ग्राहकांच्या सर्व समस्या सोडवण्याकरीता शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष कटीबध्द असल्याची ग्वाही यावेळी तालुका कक्ष प्रमुख देवेंद्र पाटील यांनी दिली. ग्राहकांचे हक्क, ग्राहक विषयी विविध कायदे, वस्तू व सेवा घेतांना ग्राहकांनी घ्यावयाची काळजी, बिलाचे महत्त्व व पर्यावरण संरक्षण अशा विविध विषयांवर मार्गदर्शन यावेळी करण्यात आले व माहिती पत्रकही वाटण्यात आले.
मान्यवरांच्या हस्ते झाले उद्घाटन
या अभियानाचे उदघाटन कक्ष तालुका प्रमुख देवेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, शहर प्रमुख बबलू बर्हाटे, उपशहर प्रमुख राकेश खरारे, उपशहर प्रमुख धनराज ठाकूर, उपशहर संघटक सोनी ठाकूर, विभाग प्रमुख विकास खडके, प्रमोद जंगले, युवासेना शहर चिटणीस मयूर जाधव यांच्यासह शिवसैनिक व्यापारी व ग्राहक उपस्थित होते. ग्राहकांना फसवण्याचे तसेच लुबाडण्याचे अनेक प्रकार होतात मात्र ग्राहकांना त्यांच्या हक्काची जाणीव नसल्याने फसवणूक झाल्यानंतर तक्रार करण्यास कुणी पुढे येत नाही. ग्राहकांमध्ये त्यांच्या हक्काची जाणीव करून देणे आणि ग्राहकांना मदतीचा हात देण्यासाठी अभियान राबवण्यात आले. यात ग्राहकांना येणार्या विविध अडचणी व त्यांची होणारी फसवणूक व त्यावर आधारित उपाययोजना याविषयी माहितीपत्रके वाटप करण्यात आली.
फसवणूक झाल्यास संपर्क साधण्याचे आवाहन
छापील किमतीपेक्षा जास्त पैसे घेणे, प्रमाणापेक्षा जास्त विजबील, हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांकडून अवाजवी रक्कम घेतली जाणे, रेशन वेळेवर येत असताना रेशन कार्ड धारकाला तो कमी अथवा वेळेवर न देणे अशा अशा ग्राहकांना भेडसावणार्या समस्या संदर्भात शिवसेनेच्या ग्राहक संरक्षण कक्षाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.