ग्राहकांना कमी इंधन दिल्यास पेट्रोलपंपांचा परवाना रद्द

0

नवी दिल्ली । उत्तर प्रदेशात पेट्रोलपंपावर इंधनाची विक्री करताना घोटाळा केल्याचे उघडकीस आल्याने कठोर पावले उचलण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ग्राहकांना कमी प्रमाणात पेट्रोल दिल्याचे निदर्शनात आल्यास पेट्रोल पंपाचा परवाना रद्द करण्यात येईल, असे सरकारकडून सांगण्यात आले. एसटीएफचा अहवाल पाहिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. पेट्रोल ग्राहकांना कमी प्रमाणात देणे हा गंभीर गुन्हा आहे. दोषी पंपमालकांवर कठोर कारवाई करण्यासाठी सरकार तयार असल्याचे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले.

गेल्या महिन्यात उत्तर प्रदेशात उपकरणाचा वापर करत मापापेक्षा कमी प्रमाणात इंधन दिल्याचे समोर आले होते. राज्यातील 1 हजारपेक्षा जास्त पेट्रोलपंपावर लहान यंत्राचा वापर करत कमी प्रमाणात पेट्रोल देत ग्राहकांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले होते. लखनऊमधील घटनेनंतर संपूर्ण देशभरात पेट्रोलपंपावर धाडी टाकण्यात येतील. ग्राहकांची फसवणूक होत नाही याची काळजी घेण्यात येईल, असे प्रधान यांनी म्हटले.

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये 13 पेट्रोल पंपावर टाकण्यात आलेल्या धाडीत मशीनमध्ये चिप लावत कमी इंधन दिल्याचे उघडकीस आले होते. या पेट्रोलपंपांना सील करण्यात आले आहे. अनेक दिवसांपासून ही चोरी सुरू असल्याचे तपासात सांगण्यात आले. देशातील हजारो पेट्रोलपंपावर अशा प्रकारची गडबडी करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे सरकारने आता पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे.