नंदुरबार। दर्जेदार व तत्पर सेवा ही महावितरणची जबाबदारी व वीजग्राहकांचा हक्क आहे. ग्राहकसेवा सुधारण्यासाठी महावितरण सदैव प्रयत्नशील आहे. महावितरणने पुरविलेल्या व ग्राहकांनी वापरलेल्या वीजेच्या प्रत्येक युनिटचा हिशोब जुळणे आवश्यक आहे. परंतु सध्या वीजबीलाची वाढती थकबाकी, वीजचोरीचे प्रमाण ही प्रमुख आव्हाने आहेत. तेंव्हा ग्राहकांनी आपले वीजबील वेळेत भरावे. तसेच वीजचोरीला आळा घालण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी केले.
सर्व तक्रारींची दखल : ग्राहकांनी मुख्य अभियंता जनवीर यांच्यासमोर प्रामुख्याने वाढीव वीज बिले, चुकीची वीज बिले, वीज बिल उशिरा मिळणे या बाबत सविस्तरपणे तक्रारी मांडल्या. ग्राहकांच्या सर्व तक्रारींची दखल घेत मुख्य अभियंता जनवीर यांनी तीन दिवसात या तक्रारींचा निपटारा करून अहवाल सादर करण्याच्या सुचना अधिका-यांना दिल्या. मोबाईल प हे ग्राहकांसाठी संजिवनी असल्याचे सांगुन आपल्या वीजपुरवठा व वीजबीलविषयक सर्व समस्यावरील उपाय आहे. तेंव्हा ग्राहकांनी मोबाईल पचा वापर करावा, असेही आवाहन श्री.जनवीर यांनी केले.
अनेक प्रश्न आणि तक्रारी
नंदुरबार शहरात 3 मे रोजी नंदुरबार जिल्ह्यातील वीज ग्राहकांच्या वीजविषयक तक्रारी निराकरणासाठी वीज ग्राहक दरबार आयोजित करण्यात आला होता.त्याप्रसंगी मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर हे ग्राहकांशी संवाद साधत होते. प्रारंभी दिपप्रज्वलनाने या ग्राहक दरबाराचे उद्घाटन करण्यात आले. ग्राहक प्रतिनिधी म्हणुन दिनानाथ जोशी, चंद्रशेखर बेहेरे यांचे स्वाग मुख्य अभियंता यांच्या हस्ते करण्यात आला. या ग्राहक दरबारास जिल्ह्यातील मुख्यत: अक्कलकुवा, धडगांव, तळोदा, नवापूर येथील ग्राहक आपल्या समस्या मांडण्यासाठी उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी विजेसंबंधी अनेक प्रश्न आणि तक्रारी केल्या.
यांची होती उपस्थिती
यावेळी अधिक्षक अभियंता नरेंद्र कोतवाल, कार्यकारी अभियंता अनिल पाटील, कार्यकारी अभियंता धनंजय भामरे, वरिष्ठ व्यवस्थापक (विवले) अमोल बोरसे, जनसंपर्क अधिकारी किशोर खोबरे, निलम गांगोडे, पंजाबराव बोरसे, डी. बी. पाटील, व्ही.बी.पाटील यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक अधिक्षक अभियंता नरेंद्र कोतवाल यांनी केले. सुत्रसंचालन उपव्यवस्थापक वाय. पी. ठाकरे तर यशस्वीतेसाठी मंडळ कार्यालयाच्या वतीने गणेश बागले व मानव संसाधन विभागातील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.