जळगाव – थकबाकी असलेले वीजमीटर कापल्याचा राग आल्याने ग्राहकाने थेट महावितरणच्या कर्मचार्यांना मारहाण केली. मंगळवारी सकाळी 10.30 वाजता बळीरामपेठ भागात ही घटना घडली.
घटना अशी की, महावितरणचे वरीष्ठ तंत्रज्ञ सागर प्रल्हाद पाथरवट (वय 30) यांच्यासह सहाय्यक अभियंता रोहित गोवे, राकेश वंजारी, सुनील महिरे, वंदना वानखेडे, दिनेशन बडगुजर यांचे पथक थकलेले वीजबील वसुली करीत होते.
बळीरामपेठेतील गंगाराम देवरे यांच्या नावावर असलेल्या घरात गणेश वसंत कुलकर्णी हे राहत आहेत. या घराचे 32 हजार 690 रुपयांचे बीजबील थकलेले आहे. हे बील भरण्याची विनंती पथकाने केली असता कुलकर्णी यांनी असमर्थता दाखवली. यामुळे पथकाने वीज मिटर काढून घेत सर्वीस वायर कट केली. याचा राग आल्यामळे कुलकर्णी यांनी थेट शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. कुलकर्णींच्या सोबत असलेल्या दोन जणांनी पाथरवट यांना मारण्यासाठी दगड उचलले.
जीवेठार मारण्याची धमकी दिली. धक्काबुक्की करुन कपडे फाडले. या प्रकरणी पाथरवट यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कुलकर्णींसह तीघांच्या विरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.