ग्राहकोपयोगी उत्पादनांच्या बाजारपेठेत भारत अग्रेसर -आनंद पुजारी

0

भुसावळ- ग्राहकोपयोगी उत्पादनांच्या बाजारपेठेत पाचव्या क्रमांकावर विराजमान होत भारतीय बाजारपेठेने सरासरी वार्षिक 15 टक्क्यांचा वृद्धीदर गाठला आहे. भारत ही नक्कीच इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी उदयोन्मुख बाजारपेठ आहे. विशेषत: टीव्ही, मोबाईल, कॉम्प्युटर्स, गॅझेट्स उद्योगक्षेत्रात तर भारतीय बाजारपेठेचा जागतिक व्यासपीठावर तिसरा क्रमांक लागतो, असे विचार ऑटोडेस्कचे एज्युकेशनल मॅनेजर आनंद पुजारी यांनी शहरातील श्री संत गाडगे बाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरींग टेक्नॉलॉजीमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यापीठाची विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत प्राध्यापकांसाठी आयोजित कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी केले.

इलेक्ट्रानिक उत्पादने गरजेच्या वस्तू
पूजारी पुढे म्हणाले की, इलेक्ट्रॉनिक उत्पादने पूर्वी बराच काळ चैनीच्या वस्तू म्हणून गणली जात असत. आता मात्र आजच्या प्रत्येक आधुनिक घरात या गरजेच्या वस्तू झाल्या आहेत. प्रॉडक्ट डिझाईनची योग्य सांगड घालत मोठ-मोठ्या कंपन्या ग्राहकांनी आकर्षित करीत असून भारत उद्योग आणि रोजगार निर्मितीत प्रगत होत चालला आहे. टीव्हीच्या बाबतीत म्हणायचे झाले तर या क्षेत्रात झालेली डिजिटल क्रांती सध्या आपल्या सर्वोच्च पातळीवर आहे. व्हिडीओ स्ट्रिमिंग तंत्रज्ञानामुळे टीव्हीचे पारंपरिक स्थानही बदलले आहे. गेल्या काही वर्षांत या क्षेत्राने मोठी गुंतवणूक आकर्षित करून घेतली आहे. यामुळे, या क्षेत्रातील उत्पादन, वितरण आणि संशोधन विकास या अंगांना मजबुती आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

यांची होती कार्यक्रमास उपस्थिती
प्रसंगी या कार्यक्रमासाठी डीबीएटीयू लोणेरे येथील समन्वयक डॉ.नीरज अग्रवाल, प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह, ऑटोडेस्कचे एक्स्पर्ट ऋषिकेश सावंत, डीन प्रा. डॉ. राहुल बारजिभे व विभागप्रमुख उपस्थित होते.औरंगाबाद, धुळे, शहादा, शिरपूर, नाशिकसह जळगाव जिल्ह्यातील 58 अभियांत्रिकीच्या प्राध्यापकांनी सहभाग नोंदवला होता. ार्यशाळेनंतर प्राध्यापकांची परीक्षा घेण्यात आली व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.