ग्राहक आयोगाचा दणका

 

 

धुळे – शहरातील श्री हिंगलाज माता नागरिक सहकारी पतसंस्थेत असलेली ठेव व त्यावरील व्याजाची रक्कम मिळत नसल्याने ठेवीदाराने ग्राहक आयोगात धाव घेतली होती. ग्राहक आयोगाने हिंगलाज माता पतसंस्थेच्या संचालकांना ठेवीची रक्कम व्याजासह परत करण्याचे आदेश दिले आहे. तसेच १५ हजार रुपये दंडही केला आहे.

शहरातील संदीप मंगीडकर आणि ललिता मंगीडकर यांच्या वडिलांनी श्री हिंगलाज माता नागरी सहकारी पतसंस्थेत मंथली इन्कम स्किमअंतर्गत गुंतवणूक केली हाेती. गुंतवलेल्या रकमेवर दरमहा व्याज देण्याचे पतसंस्थेच्या संचालक मंडळाने मान्य केले होते. मात्र, ठेवीची रक्कम किंवा व्याज दोन्ही मिळत नसल्यामुळे मंगीडकर यांनी पतसंस्थेचे संचालक राजेंद्र भावसार, प्रशांत भावसार, मोहन भावसार, विजय खैरनार, विजय पोतदार, संजय साखला, दिलीप साळुंखे, रूपाली भावसार, निर्मला भावसार, देवेंद्र साेनार, राजेंद्र ठाकूर यांच्या विरोधात अॅड. चंद्रकांत येशीराव यांच्या मार्फत ग्राहक आयोगात धाव घेतली. प्रकरणी जिल्हा ग्राहक आयोगाचे अध्यक्ष एस. पी. बोरवाल, सदस्य संजय जोशी यांच्या पीठाने ठेवीदार-तक्रारदारांचे चार लाख रुपये व त्यावरील व्याज दरसालदर शेकडा ९ टक्के दराने रक्कम फिटेपर्यंत द्यावे, तक्रारदारांना शारीरिक आणि मानसिक त्रासापोटी १० हजार तर तक्रारीच्या खर्चापोटी पाच हजार रुपये द्यावे, असे आदेश दिले आहे.