ग्राहक दिनाच्या कार्यक्रमास अधिकारीच गैरहजर

0

शासकीय अधिकारी शासन व जनतेची फसवणूक करीत असल्याचा आरोप
एरंडोल येथील कार्यक्रमात आमदार डॉ.सतीष पाटील संतप्त

एरंडोल- राष्ट्रीय ग्राहक दिनासारख्या कार्यक्रमास शासकीय अधिकारी गैरहजर राहील्यामुळे संतप्त झालेल्या आमदार डॉ.सतीश पाटील यांनी नाराजी व्यक्त करून केवळ दिपप्रज्वलन केले आणि सर्व अधिकाऱ्‍यांचा निषेध करून कार्यक्रमाची सांगता केली. शासकीय अधिकारी शासन व जनतेची फसवणूक करून लोकप्रतिनिधींचा देखील अपमान करीत आहेत असे संतप्त प्रतिपादन केले. राष्ट्रीय ग्राहक दिनास गैरहजर असणा-या अधिका-यांविरोधात वरिष्ठ अधिकाऱ्‍यांकडे तक्रार करण्याची सुचना त्यांनी तहसिलदार अर्चना खेतमाळीस यांना केली व संबधित अधिकाऱ्‍यांकडून लेखी खुलासा मागवावा असे सांगितले.

तहसिलदार कार्यालयाच्या आवारात सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आमदार डॉ.सतीश पाटील यांच्याहस्ते ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. आमदार डॉ.सतीश पाटील, नगराध्यक्ष रमेश परदेशी यांच्यासह ग्राहक संरक्षण परिषद सदस्य व ग्राहक पंचायत समितीचे सदस्य वेळेवर कार्यक्रमासाठी उपस्थित झाले. सुमारे अर्धा तासाची प्रतिक्षा करून देखील पंचायत समिती, वीज वितरण कंपनी, कृषी कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय, राज्य परिवहन महामंडळ, पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यासह अन्य शासकीय कार्यालयांचे अधिकारी अथवा त्यांचे प्रतिनिधी कार्यक्रमास गैरहजर असल्यामुळे आमदार डॉ.सतीश पाटील संतप्त झाले. ग्राहक दिन कार्यक्रमात ग्राहकांनी उपस्थित केलेल्या तक्रारीचे निरसन कोण करणार असा संतप्त प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास तहसीलदार अर्चना खेतमाळीस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस राजेंद्र शिंदे, आर.डी.पाटील, नगराध्यक्ष रमेश परदेशी, कैलास महाजन, प्रा.उज्वला देशपांडे, रश्मी दंडवते, माधव जगताप, रोहिदास पाटील, प्रविण महाजन ग्राहक पंचायतचे तालुका सहसंघटक पी.जी.चौधरी, संभाजी इंगळे, सचिन महाजन, भीमराव सोनवणे, डॉ.प्रशांत पाटील, शकील पिंजारी, सिताराम मराठे यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.