जळगाव । जिल्हा ग्राहक मंचाने रेल्वे प्रशासनाला दणका देत प्रवाशाच्या सामान चोरी प्रकरणी 1 लाख 80 हजार रुपये नुकसान भरपाई 30 दिवासांचे आत देण्याचे आदेश दिले आहेत. 13 जून 2013 रोजी केतन प्रकाश देशमूख व सविता केतन देशमूख (दोन्ही राहणार नाशिक) यांनी संकेतस्थळावरुन गाडी क्र.12810 हावडा- मुंबईचे धामणगाव-नाशिक असे वातानुकुलीत टू टियरचे तिकिट बुक केले होते. प्रवासाच्या दिवशी धामणगाव रेल्वे स्थानका येथून नाशिकरोड जाण्यासाठी गाडीत बसले असता दोघांचे आराक्षीत बर्थ वेगवेगळया डब्यात असल्याने त्यांनी टिकिट तपासणीसास एकाच डब्यात बर्थ देण्याची विनंती केल्याने टिसीने त्यांना ए वन या डब्यात बर्थ क्र. 41 व 42 दिले.त्यांच्या जवळ प्रवासात असलेल्या एक मोठी सुटकेस व दोन हॅन्ड बॅग सीट खाली ठेवल्या होत्या.
अडीच लाखाचा ऐवज झाला होता चोरी
गाडी भुसावळ रेल्वे स्थानकावर थांबल्यानंतर त्यांनी सामान तपासून पाहिला असता. सुटकेस आढळून आली नाही. देशमूख यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. ही तक्रार नंतर भुसावळ पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली. यानंतर केतन देशमूख यांनी दि युनियन ऑफ इंडिया तर्फे डिव्हीजनल मॅनेजर, मध्य रेल्वे भुसावळ, मुख्य वाणिज्य प्रबंधक भुसावळ विभाग व मुख्य रेल्वे प्रबंधक वाणिज्य विभाग मध्य रेल्वे, छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई यांच्या विरुध्द जिल्हा ग्राहक मंच जळगाव येथे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार सोन्याच्या 4 जुन्या बांगड्या, जुने मंगळसुत्र, सोन्याचे कर्णफुले, डिजीटल कॅमेरा,कपडे, रोख रक्कम 1 हजार रुपये व सुटकेस असा एकूण 2 लाख 49 हजार 200 रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. ग्राहकाच्या प्रवासाची, सामानाची काळजी घेणे व देखभाल करणे हे रेल्वेचे कर्तव्य होते. निष्काळजीपणा व हलगर्जीमुळे आरक्षीत डब्यातून देशमूख यांचा सामान चोरीला गेला. म्हणून ग्राहकमंचाने सामानाच्या नुकसान भरपाई पोटी 1 लाख 80 हजार रुपये आदेश दिले आहेत. तसेच रक्कम मुदतील अदा न केल्यास तक्रार दाखल झाल्याच्या 23 सप्टेंबर 2013 पासून ते संपुर्ण रक्कम वसूल होई पावेतो 6 टक्के व्याजदराने रक्कम अदा करावी व मानसिक व शारिरीक त्रासापोटी 5 हजार तर तक्रारीच्या खर्चापोटी 3 हजार रुपये द्यावे असा निकाल दिला आहे.