जळगाव। खानदेश वासीय आज आपल्या कार्य कर्तुत्वाचा ठसा जगभर उमटवित आहे. अशीच कौतुकास्पद बाब म्हणजे मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी येथील रहिवासी असलेली खान्देशकन्या असलेली मराठी सिने अभिनेत्री प्रियंका टोके हिने प्रमुख अभिनय केलेला ‘ग्रेट माय इंडिया’ हा बालचित्रपट शुक्रवारी 19 रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या बालचित्रपटाचे निर्मिती डॉ.राजेंद्र खेडेकर, दिग्दर्शन डॉ.शशिकांत डोईफोडे यांनी केली आहे. हा मराठीतील पहिला थ्रीडी बालचित्रपट आहे.डॉ. मोहन आगाशे, शशांक शिंदे, सुनिल गोडबोले, श्रीराम पेंडसे आणि बाल कलावंत आर्या यांनी भूमिका साकारलेली आहे.
शिक्षीकेच्यास भुमिकेत
सामान्य शेतकरी कुटुंबातील कलावंताने कला क्षेत्रात एक वेगळाच ठसा उमटवला आहे. प्रियंका टोके यांनी या चित्रपटात इंग्लिश मेडीयम स्कूलच्या शिक्षिकेची भूमिका बजावली आहे. प्रियंकाने बारावी पर्यंत शिक्षण मुळजी जेठा महाविद्यालयात घेतले. तर पदवीचे व अभिनयाचे शिक्षण पुणे येथे घेतले आहे. या आधी त्यांचा ‘मोनेळ माया’ हा कोकणी चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी प्रदर्शित होणार
शुक्रवारी महाराष्ट्रात सर्वत्र हा प्रदर्शित होत असून जळगावच्या आयनॉक्स आणि नटवर थियेटर तर मुक्ताईनगरच्या बालाजी थियेटर येथे प्रदिर्शित होणार आहे. मुंबई येथे नुकताच ‘गे्रट माय इंडिया’ या चित्रपटाचा ‘प्रिमियर’ शो झाला. यावेळी महिला व बालकल्याण विभागाचे मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. खान्देशकन्येने केलेला अभिनयीत चित्रपट कलाप्रेमीनी पहावे असे आवाहन मराठी फिल्मस् चेंबर्स ऑफ कॉमर्सचे (कोल्हापूर)चे सचिव तुषार वाघुळदे यांनी केले आहे.
अल्बमही रिलीज
नुकताच अभिनेत्री प्रियंका टोके याचा साई पदमालय मोशन पिकचर्स प्रेझेन्टस् ‘झाला वारा मंद’ हा गाण्याचा अल्बमही प्रदर्शित झाला आहे. याचे संजय चौधरी, सहनिर्मिाते गणेश लोखंडे हे असून संगीतकार प्रविण जोशी आहे. नृत्य दिग्दर्शन सुप्रसिद्ध विठ्ठल पाटील हे आहेत. या प्रसाद धेंड हा अभिनेता आहे. कार्यकारी निर्माता प्रविण वानखेडे, गीत संजय विलास यांचे असून दिग्दर्शक नितीन भास्कर हे आहेत.