पिंपरी-चिंचवड : पिंपरी चौकातील ग्रेडसेपरेटमध्ये कंटेनर अडकल्याने काहीकाळ वाहतूक कोंडी झाली. दीड तासांच्या प्रयत्नांतर हा कंटेनर बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर ग्रेडसेपरेटरमधून वाहतूक सुरु करण्यात आली.
सोमवारी दुपारी तीन ते साडेचारच्या दरम्यान ही घटना घडली. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर ग्रेडसेपरेटरमध्ये मेट्रोचे खांब उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. याकामामुळे अपघात होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून अनेकदा ग्रेडसेपरेटरमधील वाहतूक बंद करण्यात येते. सोमवारी ग्रेडसेपरेटरमधून वाहतुक सुरु असताना पुण्याच्या बाजुने आलेला कंटेनरने (क्र. एचआर 55 यू 1350) नाशिक फाटा येथे ग्रेडसेपरेटरमध्ये प्रवेश केला. ग्रेडसेपरेटर उंचीचा अंदाज न आल्याने तो ग्रेडसेपरेटरमध्ये अडकला. नंतर पोलिसांनी वाहतुक कोंडीतील वाहनांना पर्यायी मार्गाने बाहेर काढले. तसेच तब्बल दीड तासाच्या प्रयत्नानंतर कंटेनर बाहेर काढण्यात आला.