धुळे। धुळे व नंदुरबार जिल्हा ग.स.बँकेत सी.एन.देसले यांचे नेतृत्वाखाली तब्बल 13 वर्षापासून एक हाती सत्ता होती व त्या कालावधीत देसले हे स्वतः 6 वर्षे चेअरमन होते. सन 2004-05 पासून ते 22 मे 2017 या कालावधीत सी.एन.देसले व त्यांच्या अन्य सहकार्यांनी ग.स.बँकेत मनमानी व बेकायदेशीर कारभाराचा अक्षरशः धुमाकुळ घालून बँकेत 60 ते 70 कोटीची अफरातफर करुन बँकेला व सभासदांना लुटण्याचे काम केले केले. खोटे हिशोबाची पत्रके तयार करुन तोट्यातील बँकेला बोगस नफा दाखवून विनाकारण केंद्रसरकारला सुमारे 6 कोटींचा इनकमटॅक्स भरुन नुकसान पोहचविले, एवढेच नव्हे तर सी.आर.च्या डिफॉल्टमुळे रिझर्व्ह बँकेने ग.स.बँकेला तीन वेळा दंडित करुन बँकेच्या गंगाजळीतून सुमारे 1 कोटीची रक्कम भरावी लागली, असा आरोप राजेंद्र शिंत्रे यांनी केला आहे.
कॉम्प्युटर खरेदीत 5 कोटींचा मलिदा लाटला
शाखा इमारती दुरुस्ती व देखभाल, रंगरंगोटी इत्यादींच्या नावाखाली रिझर्व्ह बँकेच्या व सहकार खात्याच्या परवानगीशिवाय दरवर्षी 60 ते 70 लाखाचा खर्च दाखवून दहा वर्षात 6 ते 7 कोटींची लुट केली. साध्या बाथरुमच्या (नंदुरबार शाखा मुतारी) रिपेअरिंगसाठी देसलेंनी 6 लाखाचा खर्च दाखविला आहे. ग.स. बँक 14 ते 15 वर्षापासून 100 टक्के संगणीकृत असतांना सी एन देसलेनी छपाई व स्टेशनरीच्या खर्चापोटी दरवर्षी 80 ते 90 लाख खर्च दाखवून 8 ते 9 कोटीची लुट केली. एकीकडे छपाई स्टेशनरीची बोगस बिले टाकायची तर दुसरीकडे कॉम्प्युटर खरेदी दाखवून करोडो रुपये लुटायचे असा दुहेरी उपक्रम राबवून सी एन देसलेनी व त्यांच्या कंपुने कॉम्प्युटर खरेदीत देखील चार ते 5 कोटींचा मलिदा लाटला, असा आरोप राजेंद्र शिंत्रे यांनी केला आहे.
मोडस ऑपरेंडी भयानक !
बँकेच्या सभासदांसाठी आणि कर्मचार्यांच्या भवितव्यासाठी आपण ही लढाई लढत असून बँकेला वाचवणे हाच आपला उद्देश असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.ग.स.बँकेत सी.एन.देसलेंची पैसे लुटण्याची मोडस ऑपरेंडी एवढी भयानक होती की, चार पाच वर्षे चांगल्या अधिकार्यांच्याही लक्षातच आली नाही. 600 ते 700 रुपयांच्या प्रिमियममध्ये मिळणारा तीन ते ार लाखाच्या विमा सी.एन.देसले यांनी सभासदांना अंधारात ठेवून दरवर्षी साडे तीन ते चार हजार रुपये परस्पर कपात करुन प्रत्येक वर्षाला सुमारे 1.25 ते 1.50 कोटी रुपये हवाला रॅकेटमार्फत कमविले. दहा वर्षाचा जर विचार केला तरी ही रक्कम 13 ते 14 कोटी रुपये होते. चांगले वापरातील फर्निचर व फिक्चर्स मोडीत दाखवून दरवर्षी फर्निचर व फिक्चर्सच्या नावाखाली दरवर्षी 1.25ते1.50 कोटींची लुटमार केली. ते फर्निचर कुठे गेले याचा थांगपत्ता नाही,असा आरोप राजेंद्र शिंत्रे यांनी केला आहे.
कोट्यवधीचे केले नुकसान
रिझर्व्ह बँकेची परवानगी नसतांना देसले आणि कंपुने कर्मचार्यांच्या नावाने अत्यंत मनमानी पध्दतीने 60 ते 70 लाख रुपये बिनव्याजी वापरुन बँकेचे 70 ते 80 लाख रुपयांचे नुकसान केले आहे. रिझर्व्ह बँकेची परवानगी नसतांना देसले व त्यांचे कंपूने केवळ कमिशनचा मलिदा लाटण्यासाठी एटीएम कार्ड तयार करण्यासाठी सुमारे 1 कोटी 10 लाख रुपयांचा बेकायदेशीररित्या जनरल अॅडव्हान्स देवून बँकेचे आर्थिक नुकसान केले आहे. ग.स. बँक पगारदार शासकीस नोकरांची बँक असतांना तसेच कर्मचार्यांचा वसुलीचा हप्ता परस्पर पगारातून चेकव्दारे जमा होत असतांना सी एन देसले व त्यांच्या कंपूने वसुली खर्चाच्या नावाखाली व वाहन भाडेच्या खर्चापोटी दरवर्षी 40 ते 50 लाख रुपयांचा बोगस गाड्यांचे व्हाऊचर्स खर्ची टाकून बँकेवर दरोडा टाकला आहे, असाही आरोप शिंत्रे यांनी केला आहे.